Amravati: १५ गुन्हे असलेला प्रशांत वर्षभरासाठी कारागृहात, एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध
By प्रदीप भाकरे | Updated: March 20, 2024 22:17 IST2024-03-20T22:16:53+5:302024-03-20T22:17:12+5:30
Amravati News: बेलपुरा येथील कुख्यात गुन्हेगार प्रशांत ऊर्फ सोनू लक्ष्मण चावरे (२६) याला एमपीडीए कायद्यांतर्गत एक वर्षासाठी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. १९ मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली.

Amravati: १५ गुन्हे असलेला प्रशांत वर्षभरासाठी कारागृहात, एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध
- प्रदीप भाकरे
अमरावती - बेलपुरा येथील कुख्यात गुन्हेगार प्रशांत ऊर्फ सोनू लक्ष्मण चावरे (२६) याला एमपीडीए कायद्यांतर्गत एक वर्षासाठी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. १९ मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली. त्याच्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाचे १५ गुन्हे दाखल आहेत. पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी त्याबाबतचे आदेश काढले आहेत.
आरोपी प्रशांत चावरे हा सन २०१८ पासून गुन्हेगारी कारवायांमध्ये लिप्त आहे. त्याच्याविरुद्ध राजापेठ व बडनेरा पोलिस ठाण्यात संगनमताने दुखापत करणे, गंभीर दुखापत करण्याच्या उद्देशाने हल्ला, अश्लील शिवीगाळ करून मारण्याची धमकी, सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तणुक, दंगा करणे, अश्लील शिवीगाळ, आरोपीस आश्रय देणे, विनयभंग, खून, खुनाचा प्रयत्न, हद्दपार आदेशाचे उल्लंघन, जबरी चोरी, कट रचून जिवे मारण्याच्या उद्देशाने अपहरण करून हत्या व पुरावा नाहीसा करणे असे गंभीर स्वरूपाचे १५ गुन्हे दाखल आहेत.
तडीपार कारवाई करून देखील तो गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय असल्याने त्याच्याविरुद्ध एमपीडीए करण्यात यावा, असा प्रस्ताव राजापेठ ठाण्याकडून पाठविण्यात आला होता. स्थानबद्धतेच्या प्रस्तावाची एसीपी शिवाजीराव बचाटे व गु्न्हे शाखा प्रमुख राहुल आठवले यांनी पूर्तता केली. त्या प्रस्तावावर पोलिस आयुक्तांनी १९ मार्च रोजी आदेश पारीत केले. त्याला गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रमुख गोरखनाथ जाधव यांच्या पथकाने ताब्यात घेऊन राजापेठ पोलिस ठाण्यात हजर केले. तेथून त्याला स्थानबद्धतेच्या कालावधीकरिता मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले.