अमरावती-मुंबई विमानसेवा आठवड्यातून दोनच दिवस; वेळेतही झाला बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 17:23 IST2025-12-16T17:14:16+5:302025-12-16T17:23:10+5:30
Amravati : हवामानात सातत्याने होणारा बदल आणि दाट धुक्यामुळे दृश्यमानतेच्या समस्यांनी विमानसेवेला फटका बसत आहे. त्यामुळे अलायन्स एअर कंपनीने अमरावती विमानतळाहून सुरू असलेले मुंबई-अमरावती-मुंबई हे एटीआर-७२ आसनी विमान आठवड्यातून दोनच दिवस सुरू राहणार आहे.

Amravati-Mumbai flight service only two days a week; timings also changed
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : हवामानात सातत्याने होणारा बदल आणि दाट धुक्यामुळे दृश्यमानतेच्या समस्यांनी विमानसेवेला फटका बसत आहे. त्यामुळे अलायन्स एअर कंपनीने अमरावती विमानतळाहून सुरू असलेले मुंबई-अमरावती-मुंबई हे एटीआर-७२ आसनी विमान आठवड्यातून दोनच दिवस सुरू राहणार आहे. सोमवार, शुक्रवार असे दोन दिवस प्रवाशांना मुंबई ये-जा करता येणार असून, अमरावती विमानतळावरून मुंबईच्या दिशेने दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी झेपावेल, असे नवे वेळापत्रक संकेतस्थळावर जारी करण्यात आले आहे. धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे यापूर्वी १ ते १५ डिसेंबर यादरम्यान अमरावती-मुंबई विमानसेवा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर होता.
आता अलायन्स एअर कंपनीने वेळेत बदल आणि आठवड्यातून दोनच दिवस विमानसेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईहून अमरावती विमानतळावर विमान दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल. वातावरणात बदलामुळेच विमान सेवेच्या वेळेत बदल करण्यात आल्याची बाबदेखील स्पष्ट करण्यात आली आहे.
- अमरावती टेकऑफ : दुपारी २ वाजून १५ मिनिटे
- मुंबईहून टेकऑफ : दुपारी १२. ५ मिनिटे
- मुंबई लैंडिंग : दुपारी ४ वाजता
- अमरावती लॅडिंग : दुपारी १.५० वा.
"हवामानात सातत्याने होणारा बदल हा विमानसेवेला अडसर ठरत आहे. त्यातही दाट धुक्यामुळे दृश्यमानता ही मोठी समस्या ठरत आहे. अमरावतीकर प्रवाशांनी काही काळ होणारा त्रास सहन करून अलायन्स एअर कंपनीला सहकार्य करावे. आता आठवड्यातून सोमवार, शुक्रवार असे दोन दिवस अमरावती-मुंबई सेवा सुरू असेल."
- राजकुमार पटेल, प्रबंधक अमरावती विमानतळ