Maharashtra Crime: बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील एका विद्यालयात वरिष्ठ लिपिक अतुल पुरी यांचा २२ ऑगस्ट रोजी सकाळी बडनेरा रेल्वे स्टेशनजवळ खून करण्यात आला. त्या खुनाची यशस्वी उकल करण्यात गुन्हे शाखेला यश आले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तपासाअंती मेहुण्यानेच अतुल पुरी यांच्या हत्येची सुपारी दिल्याचा धक्कादायक उलगडा झाला आहे. राहुल भगवंत पुरी (३६, रा. माणिकवाडा धनज. ता. नेर) असे मास्टरमाईंड मेहुण्याचे नाव आहे.
अतुल पुरी हे नेहमीप्रमाणे ड्युटीवर जाण्यासाठी दुचाकीने बारीपुरामार्गे बडनेरा रेल्वे स्थानकाकडे २२ ऑगस्ट रोजी सकाळी ९ च्या सुमारास निघाले होते. त्यांच्या खूनप्रकरणी गुन्हे शाखेने राहुल पुरीसह प्रशांत भास्करराव वहऱ्हाडे व गौरव गजानन कांबे यांनादेखील २७ऑगस्ट रोजी अटक केली.
हत्या प्रकरणात कुणा-कुणावर कारवाई?
अक्षय प्रदीप शिंपी हा आरोपी पसार आहे. यापूर्वी या प्रकरणात गुन्हे शाखेने साहिल उर्फ गोलू हरी मोहोड (१९, रा. आदिवासी कॉलनी) व सक्षम विजय लांडे (१९, रा. सावंगा गुरव. ता. नांदगाव खंडेश्वर, ह.मु, यादव यांचे घरी भाड्याने, व्यंकय्यापुरा) या दोघांना अटक, तर तीन विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले होते.
२२ ऑगस्ट रोजी सकाळी ८ च्या सुमारास बडनेरा रेल्वेस्थानक ते तिलकनगर मार्गावर रस्त्याच्या कडेला एक मृतदेह रक्तबंबाळ स्थितीत आढळला होता. अतुल ज्ञानदेव पुरी (वय ५०, रा. पुंडलिकबाबा नगर) अशी मृताची ओळख पटविण्यात आली होती.
कारंजा लाडला पळाले
२२ ऑगस्ट रोजी सकाळी अतुल पुरी हे बडनेरा रेल्वे स्थानकाकडे दुचाकीने जात होते. त्यावेळी दुचाकीवर असलेल्या तिघांनी पाठलाग करून अडवून त्यांची हत्या केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले होते. ते तिघेही मारेकरी वर्धा जिल्ह्यातील कारंजा येथे निघून गेले होते. त्यांना गुन्हे शाखेने कारंजालाड येथून अटक करून बडनेरा पोलिसांच्या ताब्यात दिले होते.