लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत सर्वात कमी ५६ टक्के नांदगाव खंडेश्वर, ५६.६ टक्के भातकुली व ५७.५ टक्के पाऊस धारणी तालुक्यात झालेला आहे. याशिवाय १९ मंडळात सरासरीच्या ५० ते ६० टक्क्यांच्या आत पाऊस झालेला आहे. जिल्ह्यात ३१ टक्के पावसाची तूट आहे. जमिनीत आर्द्रता नसल्याने पिकांची वाढ खुंटली. अर्धापेक्षा जास्त पावसाळा संपल्याने या तालुक्यांसह १९ महसूल मंडळात कोरड्या दुष्काळाचे सावट आहे.
जिल्ह्यात ५ ऑगस्टपर्यंत ४७८.३ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ३२९.९ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. ही टक्केवारी ६९ आहे. यामध्ये फक्त तिवसा तालुक्यात सरासरीच्या १०६ टक्के पावसाची नोंद झाली. याशिवाय सर्वात कमी नांदगाव खंडेश्वर ५६.३ टक्के, धारणी ५७.५ टक्के, अचलपूर ६०.७टक्के व भातकुली तालुक्यात ५६.७टक्केच पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
जिल्ह्याची हवामान स्थितीयु.पी., पंजाब आणि बिहारवर हवेच्या वरच्या थरात चक्राकार वारे आहेत. मान्सूनची ट्रफरेषा सध्या फिरोजपूर, चंडीगड, पाटणावरून बंगालच्या उपसागरात गेलेली आहे. त्यामुळे मध्य भारतात पाऊस कमी झालेला आहे आणि पावसाची उसंत आहे. ७ऑगस्टपासून पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
चुर्णीत सर्वात कमी ३९ टक्केच पाऊसचुरनी महसूल मंडळात सर्वात कमी ३९.५ टक्के तर वरखेड मंडळात सर्वाधिक १४९ टक्के पावसाची नोंद झाली. याशिवाय सरासरीच्या तुलनेत फक्त ५० ते ६० टक्के पाऊस धारणी, सावलीखेडा, साद्राबाडी, गौलखेडा बाजार, अमरावती, बडनेरा, वलगाव, भातकुली, आष्टी, आसरा, खोलापूर, नांदगाव, मंगरूळ, लोणी, धानोरा, माहुली, दारापूर, अचलपूर, परसापूर व परतवाडा मंडळात झाला. पावसाअभावी जमिनीत पुनर्भरण झालेले नाही. त्यामुळे जमिनीत आर्द्रतेचे प्रमाण कमी आहे. शिवाय भूजलस्तरदेखील वाढलेला नाही. नदी-नाल्यांनादेखील फारसे पाणी नाही.
आतापर्यंत झालेला तालुकानिहाय पाऊसअमरावती तालुक्यात ६४ टक्के, चांदूरबाजार ७९.६ टक्के, मोर्शी ८९.९ टक्के, वरुड ८८.४ टक्के, दर्यापूर ८१ टक्के, अंजनगाव ८६.५, चांदूरबाजार ७९.६ टक्के व धामणगाव तालुक्यात ७८.२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. आठ दिवस रिमझिम पावसाने पिकांना उभारी मिळाली असली, तरी पावसाची तूट कायम असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.