Amravati: १२ महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे, २८ ठिकाणी बसविणार
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: October 28, 2023 20:01 IST2023-10-28T19:59:41+5:302023-10-28T20:01:03+5:30
Amravati News: जिल्ह्यातील ९० महसूल मंडळात यापूर्वीच स्वयंचलित हवामान केंद्र स्थापित करण्यात आलेले आहे. मात्र २८ केंद्रांत विविध त्रुटी, केंद्रात वाढलेली झुडपे, काही ठिकाणी चोरी यासह अन्य समस्या निर्माण झालेल्या आहेत.

Amravati: १२ महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे, २८ ठिकाणी बसविणार
अमरावती - जिल्ह्यातील २८ महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी सद्यस्थितीत १२ केंद्रासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ उपलब्ध झाल्याने ही केंद्र तातडीने स्थापन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी कृषी विभागासह स्कायमेट वेदर कंपनीला दिले आहेत.
जिल्ह्यातील ९० महसूल मंडळात यापूर्वीच स्वयंचलित हवामान केंद्र स्थापित करण्यात आलेले आहे. मात्र २८ केंद्रांत विविध त्रुटी, केंद्रात वाढलेली झुडपे, काही ठिकाणी चोरी यासह अन्य समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे या केंद्रात तातडीने स्वयंचलित हवामान केंद्र स्थापित करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिलेले आहे.
याकरिता जागेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यामुळे सोयीची जागा निवडून त्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे महत्त्वाचे आहे. काही स्वयंचलित हवामान केंद्रांमध्ये पावसाच्या चुकीच्या नोंदी झाल्याने शेतकऱ्यांना पीक विमा व तसेच ‘एनडीआरएफ’चा निधी मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या, हे येथे उल्लेखनीय. त्यामुळे कृषी विभागाने ही बाब गंभीरतेने घेत स्वयंचलित हवामान केंद्र स्थापित करण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. या संदर्भात जिल्हा समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत.
या ठिकाणी राहणार स्वयंचलित हवामान केंद्र
कृषी विभागाचे माहितीनुसार परतवाडा, माहुली जहॉगीर, कापूसतळणी, दारापूर, दर्यापूर उसळगाव, मंगरूळ दस्तगीर, तळेगाव दशासर, अंजनसिंगी, मंगरूळ चव्हाळा, नांदगाव खंडेश्वर व शिवणी या महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र स्थापित करणार आहेत. यासाठी जागेची निवड करून एनओसी देण्यात आलेली आहे.