पक्षीगणनेत ८० प्रजातींच्या ८५० पक्षांची नोंद
By Admin | Updated: February 19, 2017 00:15 IST2017-02-19T00:15:51+5:302017-02-19T00:15:51+5:30
गे्रट बॅकयार्ड बर्ड काऊंटिंग कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी पक्षी गणनेकरिता तरुणाई एकवटली.

पक्षीगणनेत ८० प्रजातींच्या ८५० पक्षांची नोंद
पहिल्याच दिवशी तरुणाई एकवटली : वडाळी बांबू गार्डनपासून सुरुवात
अमरावती : गे्रट बॅकयार्ड बर्ड काऊंटिंग कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी पक्षी गणनेकरिता तरुणाई एकवटली. शुक्रवारी वडाळी बांबू गार्डनमध्ये कॅम्पस बर्ड कॉऊंटिंगअंतर्गत ८० प्रजातीच्या ८५० पक्ष्यांची नोंदी करण्यात आल्यात.
या पक्ष्यांची नोंदणी करण्यासाठी पक्षी अभ्यासक तथा मानद वन्यजीव रक्षक जयंत वडतकर, दिशा फाऊंडेशनचे वन्यजीव अभ्यासक यादव तरटे, वेक्स संस्थेचे विशाल गवळी, मनीष ढाकुलकर, ऋतुजा कुकडे यांनी सहभाग नोंदविला. यावेळी महिला महाविद्यालयाच्या २५ विद्यार्थिंनींनी बर्ड कॉऊंट, पक्षी नोदींचे महत्त्व व प्रत्यक्ष पक्षी नोंदणी कशी करावी, हे जाणून घेतले. वडाळी बांबु गार्डन, नर्सरी व वडाळी तलाव या तिन्ही ठिकाणी पक्षीमित्रांनी गणना सुरु केल्यानंतर ८० प्रजातींचे ८५० पक्षी मोजण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य हेमा सोनटक्के, प्रवीण मातोडे, पर्यावरण संवर्धन संस्थेचे प्राची पालकर, मिनाक्षी राजपुत आदिनी प्रयत्न केले. याशिवाय जळका, सावर्डी तलावावर वेक्स संस्थेचे सौरभ जवंजाळ, दिपाली बाभुळकर व अंजनगाव परिसरात मनीष घुरडे यांनी पक्ष्यांच्या नोंदी घेतल्या.
२० पर्यंत होणार गणना
गे्रट बँकयार्ड बर्ड काऊंटींग अंतर्गत विद्यापीठ, विमवि, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, वरुड, परतवाडा, मेळघाट व जिल्ह्यातील बहुतांश तलावावर ही पक्षी गणना २० फेब्रुवारीपर्यंत केली जाणार आहे.