अमोनियाचा बर्फ वाढवतो रसाची शितलता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:12 IST2021-04-05T04:12:31+5:302021-04-05T04:12:31+5:30

चांदूर बाजार : उसाचा रस, आईस गोला, रसवंती, लिंबू सरबत या गोष्टींशिवाय उन्हाळा सहसा निघत नाही. लहान असो वा ...

Ammonia ice increases the cooling of the juice | अमोनियाचा बर्फ वाढवतो रसाची शितलता

अमोनियाचा बर्फ वाढवतो रसाची शितलता

चांदूर बाजार : उसाचा रस, आईस गोला, रसवंती, लिंबू सरबत या गोष्टींशिवाय उन्हाळा सहसा निघत नाही. लहान असो वा ज्येष्ठ सर्वांची धाव उन्हाळ्यात या पेयाकडे असते. उन्हाळ्यात या पेयाची विक्री अनेकांना व्यवसाय उपलब्ध करून देते. यात नफा तर मिळतोच पण अधिकाधिक नफा कमावण्याच्या मोहात काही व्यावसायिकांनी अक्षरशः नागरिकांच्या जिवाशी खेळ मांडला आहे.

शहरात रस्त्या-रस्त्यांवर विकल्या जाणारा आईसगोला, कुल्फी, लिंबू सरबत, ऊसाचा रस आदींमध्ये अखाद्य म्हणजे उद्योगासाठी वापरल्या जाणाऱ्या बर्फाचा सर्रास वापर होत आहे. हा बर्फ अमोनिया वायू व दूषित पाण्याद्वारे तयार केला जात असल्याने जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहेत. आता उन्हाळा सुरू झाला असून, रात्री तापमान कमी असले तरी दिवसा मात्र उन्हाचा तडाखा सुरू आहे. अशावेळी कोल्ड्रिंक, रसवंती, लिंबू सरबत, आईस्क्रीम आणि ज्युस सेंटरवर गर्दी वाढू लागली आहे. एखाद्या बर्फ गोलेवाला अथवा सरबतवाला समोर आला तर त्याची चव चाखल्याशिवाय पुढे जावेसे वाटत नाही. मात्र, ऊसाचा रस किंवा अन्य पेयात टाकण्यात येणारा बर्फाचा खडा कुठून येतो, किंवा तो कसा तयार होतो. त्याठिकाणी आरोग्यदायी वातावरण आहे अथवा नाही, याची खातरजमा कुणीही करीत नाही.

जिल्ह्यात बर्फ तयार करणाऱ्या कंपनी केवळ कुलिंगसाठी अखाद्य बर्फ तयार करतात. आइसस्क्युब महाग असल्याने याचा वापर मोठे हॉटेल, बियर बार येथेच होतो. कुलिंगसाठी वापरण्यात येणारा बर्फाचा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात खाण्यासाठी वापर होत असल्याचे वास्तव्य आहे. अखाद्य बर्फ बनवणाऱ्या कंपन्या आपला बर्फ मोठ्या आकाराचा व्हावा, जास्त काळ टिकावा यासाठी अमोनियाचा वापर करतात. त्याच्या जोडीला विविध वायू आणि दूषित पाणी असते. हा बर्फ दूध, मासे आणि रासायनिक उत्पादकांना देण्यासाठी तयार केला जातो.

या बर्फातील सर्वच घटक आरोग्याच्या दृष्टीने फार घातक असतात. असे असतानाही अन्न व औषध प्रशासनाच्या नाकावर टिच्चून औद्योगिक वापरासाठी असलेल्या बर्फाची खाद्यपदार्थ म्हणून विक्री होत आहे. बर्फ तयार करणाऱ्या कंपन्यांना नळाचे पाणी पुरत नाही. म्हणून काहीजण खासगी टँकरचे पाणी वापरतात. काही कारखाने विहीर किंवा बोरवेलचे पाणी वापरतात. हे पाणी पिण्यास योग्य आहे की, नाही याची कुणीही खातरजमा होत नाही. बर्फासाठी वापरण्यात येणारे पाणी निर्जंतुक आहे की, नाही याचीही तपासणी होत नाही. मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणारे बर्फ अस्वच्छ पाण्यापासूनच तयार होत असल्याचे चित्र आहे.

बर्फ साठविण्याची जागा अत्यंत गलिच्छ

शहरातील महत्त्वाच्या चौकातील फुटपाथवर बर्फाची सर्रास विक्री होते. बर्फ साठवण्याची ही जागा अत्यंत गलिच्छ असते. बर्फ ऊन लागू नये म्हणून ते सावलीच्या ठिकाणी अंथरली जाणारी पोते तसेच बर्फाच्या लाद्या गुंडाळली जाणार पोते अत्यंत घाणेरडी असतात. बर्फाचे वितळलेले पाणीने त्याखाली चिखल साचून डबके तयार होते. तरी बर्फ दिवसभर त्यात असतो. हा सगळा प्रकार रोगराई पसरविणारा असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बहुसंख्य आइस गोले विक्रेते, कुल्फीवाले, लिंबू सरबत, ऊसाचा रस विक्रेते येथून बर्फ घेऊन जातात. या बर्फापासून तयार केले जाणारे पेय आपल्याला पोटाचे अनेक गंभीर विकार देण्यासाठी पुरेसे असतात. त्यामुळे आपल्यालाच आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे झाले आहे.

Web Title: Ammonia ice increases the cooling of the juice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.