आसरा-दर्यापूर मार्गावरील अंबाळा नाल्यावरचा रपटा गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 05:01 IST2020-06-18T05:00:00+5:302020-06-18T05:01:30+5:30

इंदूर येथील पी.डी. अग्रवाल या कंपनीला या मार्गाचे रुंदीकरण व नाल्यावरील पुलाच्या बांधकामाचे कंत्राट देण्यात आले आहे. उन्हाळ्यातच काम सुरु झाल्यानंतर कंपनीने मुख्य पूल तोडून त्याच्या बाजूला वाहतुकीला पर्याय व्यवस्था म्हणून दुसरा रपटा तयार करून दिला. मात्र, अंबाळा नाल्याला आलेल्या पुरामुळे पहिल्या पावसातच तो रपटा वाहून गेल्यामुळे सोमवारी रात्रीपासूनच या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

The Ambala Nala on the Asara-Daryapur road was swept away | आसरा-दर्यापूर मार्गावरील अंबाळा नाल्यावरचा रपटा गेला वाहून

आसरा-दर्यापूर मार्गावरील अंबाळा नाल्यावरचा रपटा गेला वाहून

ठळक मुद्देभातकुली-दर्यापूर वाहतूक ठप्प : शेलूबाजार मार्गे वळविली वाहतूक

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : हायब्रीड अ‍ॅन्युईटी अंतर्गत बांधकाम होत असलेल्या आसरा-दर्यापूर मार्गावरील आसरा येथील अंबाळा नाल्यावरील पूल तोडण्यात आला. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे या नाल्याला पूर आला. यात कंत्राटदार कंपनीने पर्याय व्यवस्था म्हणून तयार केलेला रपटा (पूल) वाहून गेला. भातकुली-दर्यापूर मार्गावरील वाहतूक यामुळे ठप्प झाली आहे.
इंदूर येथील पी.डी. अग्रवाल या कंपनीला या मार्गाचे रुंदीकरण व नाल्यावरील पुलाच्या बांधकामाचे कंत्राट देण्यात आले आहे. उन्हाळ्यातच काम सुरु झाल्यानंतर कंपनीने मुख्य पूल तोडून त्याच्या बाजूला वाहतुकीला पर्याय व्यवस्था म्हणून दुसरा रपटा तयार करून दिला. मात्र, अंबाळा नाल्याला आलेल्या पुरामुळे पहिल्या पावसातच तो रपटा वाहून गेल्यामुळे सोमवारी रात्रीपासूनच या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गाने होणारा भातकुली व दर्यापूर तालुक्यांतील थेट संपर्क आता तुटला आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून मूर्तिजापूर तालुक्यातील शेलूबाजार येथून वाहतूक वळविण्यात आली आहे. जर त्यामुळे आता एखाद्या व्यक्तीला भातकुलीहून दर्यापूर जायचे असेल, तर आसरा, शेलूबाजार, एंडली, आमला व नंतर आमला ते कळाशी मार्गे दर्यापूर, अन्यथा आमला, कळमगव्हाण मार्गे दर्यापूर जावे लागत आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

मुख्य पुलाचे बांधकाम सुरू असल्याने वाहतुकीला पर्यायी व्यवस्था म्हणून रपटा तयार करण्यात आला. पुरामुळे तो खचला. अपघात होऊ नये म्हणून त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. दोन ते तीन दिवसांत काम पूर्ण होईल.
- अनिल जवंजाळ, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

Web Title: The Ambala Nala on the Asara-Daryapur road was swept away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस