अंबा, एकवीरा देवीच्या महाप्रसादात भेदभाव का?
By Admin | Updated: October 26, 2015 00:30 IST2015-10-26T00:30:47+5:302015-10-26T00:30:47+5:30
विदर्भनगरीचे कुलदैवत अंबा-एकवीरेचा नवरात्रौत्सव नुकताच आटोपलाय. या अनुषंगाने रविवारी दोन्ही संस्थानांमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

अंबा, एकवीरा देवीच्या महाप्रसादात भेदभाव का?
निमंत्रितांनाच प्रवेश : गोरगरीब, सामान्यांसह हजारो भाविक प्रसादापासून वंचित
वैभव बाबरेकर अमरावती
विदर्भनगरीचे कुलदैवत अंबा-एकवीरेचा नवरात्रौत्सव नुकताच आटोपलाय. या अनुषंगाने रविवारी दोन्ही संस्थानांमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. मात्र, निवडक निमंत्रितांनाच महाप्रसादाचा लाभ मिळाला. इतर शेकडो गोरगरीब भाविक मात्र या महाप्रसादापासून वंचित राहिले. वास्तविक निमंत्रणाद्वारे झडतात त्या जेवणावळी, महाप्रसाद नव्हे. याचा अंबा-एकवीरा देवी विश्वस्तांना विसर पडला की काय?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरवर्षी नवरात्रौत्सवात अंबा-एकवीरेच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची अंबानगरीत गर्दी उसळते. नऊ दिवस शहर गजबजलेले असते. राज्यभरातून लाखो भाविक अंबा-एकवीरेच्या दर्शनासाठी येतात. संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी एकविरा देवी संस्थानाला ८० ते ९० लाखांच्या जवळपास दानाची रक्कम भक्तांकडून प्राप्त होते. मात्र, गरिबासाठी महाप्रसाद खुला न करता पत्रिकाधारकांनाच महाप्रसाद दिला जातो.
वर्षभर मंदिरात सेवा देणारे, अधिकारी, दानदाते व ओळखीतील व्यक्तींना महाप्रसादाचे निमंत्रण देण्यात येते. महाप्रसाद सार्वजनिक असल्यास नागरिक प्रचंड गर्दी करतात. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण राहत नाही. त्यामुळेच पत्रिका वाटप केल्या जातात.
- रमेश गोडबोले,
अध्यक्ष, एकवीरा देवी संस्थान.
नऊ दिवस निरंकार उपवास करून अंबा व एकवीरा देवीच्या महाप्रसादासाठी गेलो होतो. मात्र, पत्रिका नसल्यामुळे सुरक्षा रक्षकांनी आत जाऊ दिले नाही, ही काय माणुसकी आहे ?
-नरेंद्र कापसे, भाविक.
अंबादेवी व एकविरा देवी धार्मिक स्थळ आहे. देवीचे मंदिर सर्वांसाठी खुले असते. मग महाप्रसादासाठी पत्रिका देणे हे योग्य नाही.
- शक्ती तिडके, भाविक.
दसऱ्याला अंबादेवीचे मंदिर ११ वाजताच बंद
दसऱ्याच्या दिवशी अंबा व एकवीरेच्या मूर्ती पालखीतून सीमोल्लंघनासाठी नेल्या जातात. त्यावेळी हजारो अमरावतीकर पालखीचे दर्शन घेतात. त्यानंतर पुन्हा देवी मंदिरात आणल्या जाते. पहाटेपासून रात्री १२ वाजेपर्यंत अंबा-एकवीरा देवीचे मंदिर भाविकांसाठी खुले असते. मात्र, यंदा अंबादेवी मंदिराचे प्रवेशद्वार ११ वाजताच बंद केल्याने बाहेरगावावरून आलेल्या शेकडो भाविकांना निराश होऊन दर्शनाशिवायच परतावे लागले. यावरून अंबादेवीच्या विश्वस्तांचा मनमानी कारभार दिसून येतो.