अमरावती गारठले
By Admin | Updated: December 25, 2015 23:59 IST2015-12-25T23:59:48+5:302015-12-25T23:59:48+5:30
उत्तरेकडील थंड वारे ताशी १० किलोमिटर वेगाने विदर्भाकडे येत असल्यामुळे विदर्भासह अमरावती जिल्हा गारठला आहे.

अमरावती गारठले
ताशी १० किमी वेगाने थंड वारे विदर्भाकडे
वैभव बाबरेकर अमरावती
उत्तरेकडील थंड वारे ताशी १० किलोमिटर वेगाने विदर्भाकडे येत असल्यामुळे विदर्भासह अमरावती जिल्हा गारठला आहे. येत्या काही दिवसांत तापमान ८ डिग्री सेल्सीअसखाली जाण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तविली असून नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्याची गरज आहे.
विदर्भावरील चक्राकार वारे उत्तरेकडे सरकल्यामुळे तसेच राज्यस्थान, गुजरातकडून थंड वारे विदर्भात येत असल्याने जिल्ह्यात थंडीची मध्यम लाट पसरली आहे. परंतु वातावरणात वेगाने बदल होत असल्याचे हवामानतज्ज्ञांचे मत आहे. बदलत्या हवामानात ढगाळ वातावरण निर्माण झाल्यास थंडीचा प्रभाव पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, तसे न झाल्यास डिसेंबरच्या सरतेशेवटी थंडीचा प्रभाव कायम राहणार असून जानेवारीत सुध्दा हुडहुडी भरणार असल्याची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे. यंदा थंडीला तब्बल १५ दिवस उशिरा सुरूवात झाली. सोमवारपासून हळूहळू थंडी वाढत आहे. सोमवारी जिल्ह्यात १५ डिग्री सेल्सीअस तापमानाची नोंद करण्यात आली असून त्यानंतर तापमान खाली घसरत आहे. दोनच दिवसात गारठ्याने नागरिक हैराण झाले आहेत. ग्रामीणच नव्हे तर शहरी भागातही शेकोट्या पेटू लागल्या आहेत. पहाटेपासून थंड व गारठण्याऱ्या वाऱ्यामुळे नागरिक घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत.