अखेर नगरसेवकांना समान निधीचे वाटप

By Admin | Updated: July 17, 2015 00:20 IST2015-07-17T00:20:26+5:302015-07-17T00:20:26+5:30

महापालिकेत परंपरागत निधी, अनुदान वाटपाला फाटा देत महापौरांनी नगरसेवकांना समान निधी वाटप करण्याचा आदर्श निर्णय घेतला आहे.

Alloted equal funds to corporators | अखेर नगरसेवकांना समान निधीचे वाटप

अखेर नगरसेवकांना समान निधीचे वाटप

महापौरांचा आदर्श निर्णय : प्रत्येकी २५ लाखांचा निधी मिळणार
अमरावती : महापालिकेत परंपरागत निधी, अनुदान वाटपाला फाटा देत महापौरांनी नगरसेवकांना समान निधी वाटप करण्याचा आदर्श निर्णय घेतला आहे. या निर्णयाला सर्वस्वी मानून आयुक्तांनी देखील याच सूत्रानुसार १३ व्या वित्त आयोगातून २५ लाख रुपये याप्रमाणे प्रत्येक नगरसेवकाला विकासकामांसाठी निधी देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे निधीपासून डावलले, हा यापूर्वी नगरसेवकांचा होणारा आरोप या निर्णयामुळे पुसून निघाला आहे.
महापालिकेत अनुदान, निधी वाटप करताना यापूर्वी सत्तापक्ष, विरोधीपक्ष तसेच अन्य पक्षाच्या नगरसेवकांना क्रमवारीनुसार वाटप व्हायचा. यात सत्तापक्षाचे सदस्य मर्जीनुसार अनुदान, निधी वाटप करुन आपल्या वाट्यावर अधिक निधी पळवून न्यायचे. त्यामुळे महापालिकेत सत्तापक्षाविरु द्ध विरोधी पक्ष हा संघर्ष कायमराहात होता. परंतु चंद्रकांत गुडेवार आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर समान न्याय, समान निधी वाटपाचा मंत्र पुढे आणला.
ही विकास कामे करणे बंधनकारक
१३ व्या वित्त आयोगातून कोणती विकासकामे करायची, ही मार्गदर्शक तत्त्वे शासनाने ठरवून दिली आहे. या कामांव्यतिरिक्त अन्य कोणतीही विकासकामे घेता येणार नाहीत, अशी बंधने लादण्यात आली आहे. यात घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा व स्वच्छता, सामाजिक पायाभूत सुविधांचा विकास, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राबवायच्या सुधारणा विषयक कार्यक्रमासह ईतर अनुज्ञेय कामांचा समावेश असावा.
महापालिका इतिहासात पहिल्यांदाच समान निधी वाटपाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे कोणत्याही नगरसेवकांवर निधी वाटपात अन्याय झाला नाही, हे स्पष्ट होईल.
चंद्रकांत गुडेवार,
आयुक्त, महापालिका
निधी वाटपात सापत्न वागणुकीची नगरसेवकांची ओरड नव्या निर्णयामुळे पुसून निघेल. शासन निधीवर सर्वाचा अधिकार या तत्त्वानुसार समान निधी वाटपाचे सूत्र ठरविले आहे.
-चरणजित कौर नंदा,
महापौर, महापालिका

Web Title: Alloted equal funds to corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.