अप्पर वर्धाची सर्व दारे उघडली
By Admin | Updated: July 27, 2014 23:29 IST2014-07-27T23:29:34+5:302014-07-27T23:29:34+5:30
शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अप्पर वर्धा धरणाचा जलस्तर वाढल्याने रविवारी दुपारी १२ नंतर धरणाचे सर्व तेराही दरवाजे उघडण्यात आले. सुरूवातीला सकाळी १० वाजता

अप्पर वर्धाची सर्व दारे उघडली
मोर्शी : शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अप्पर वर्धा धरणाचा जलस्तर वाढल्याने रविवारी दुपारी १२ नंतर धरणाचे सर्व तेराही दरवाजे उघडण्यात आले. सुरूवातीला सकाळी १० वाजता अप्पर वर्धा धरणाचे ७ आणि १२ वाजताच्या सुमारास संपूर्ण १३ दरवाजे उघडण्यात आले.
अप्पर वर्धा धरणातून दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास ४२५० घनमीटर प्रतिसेकंद एवढा पाण्याचा विसर्ग होत आहे. आष्टी मार्गावरील पूल धरणाच्या पाण्यात बुडाल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. अप्पर वर्धा धरणाची महत्तम जलसंचय क्षमता ३४२.५० मीटर इतकी आहे. परंतु पावसाच्या दर महिन्यात जलस्तर किती असावा, याचे नियोजन करण्यात येते. जुलै महिन्यात ३४१.०४ मीटर एवढा जलस्तर निर्धारित करण्यात आला. दोन दिवसांपूर्वीच धरणातील जलस्तर ३४१.३२ मीटरपर्यंत पोहोचला होता.
आॅगस्ट महिन्यात जलपातळी ३४२.०२ इतकी ठेवायची असल्यामुळे धरण प्रशासनाने ‘वेट अँड वॉच’ ची भूमिका घेतली होती. परंतु शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाने पुन्हा जोर धरल्याने नदी नाल्यांना पूर आला.
रविवारी सकाळी धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. यामुळे सकाळी १० वाजता धरणाची १३ पैकी ७ दारे उघडून ३३३ घनमीटर प्रतिसेकंदनुसार पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. धरणस्थळी उपविभागीय अभियंता मेश्राम, शाखाप्रमुख साने आपल्या कर्मचाऱ्यांसोबत ठाण मांडून बसले होते.
धरणातील पाण्याची वाढती आवक पाहता दुपारी १२.३० वाजता धरणाचे सर्व १३ व्दार उघडण्यात येऊन १६४३ घनमीटर प्रतिसेकंद इतका पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. त्यामुळे धरणासमोरील आष्टी मार्ग पाण्याखाली आल्याची माहिती आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास धरणात पाण्याचा येवा ४२५० घनमीटर प्रतिसेकंद इतका वाढला. याच दराने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी रात्रीपासून सातत्याने पाऊस बरसत आहे. त्यात अजूनही खंड पडलेला नाही. त्याचप्रमाणे मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस झाल्याने वर्धा नदीला महापूर आला आहे. परिणामी अप्पर वर्धा धरणात पाण्याचा येवा झपाट्याने वाढत आहे. पुढेही पाण्याचा अंदाज असल्याने आणखी दारांची उंची वाढविण्याची शक्यता नाकारता येत नाही. (तालुका प्रतिनिधी)