कृषी सेवा केंद्रासाठी जुन्यांना दिलासा, नव्यांना संधी
By Admin | Updated: October 26, 2015 00:31 IST2015-10-26T00:31:31+5:302015-10-26T00:31:31+5:30
रासायनिक खत विक्रीचे परवाने यापुढे केवळ कृषी शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनाच मिळणार आहेत.

कृषी सेवा केंद्रासाठी जुन्यांना दिलासा, नव्यांना संधी
अमरावती : रासायनिक खत विक्रीचे परवाने यापुढे केवळ कृषी शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनाच मिळणार आहेत. केंद्र शासनाच्या कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या खते नियंत्रण चौथा संशोधन आदेश २०१५ नुसार यास मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भात राजपत्र १० आॅक्टोबर रोजी प्रसिद्ध झाले आहे.
रासायनिक खत दुकानाचा परवाना घ्यायचा आहे. त्यांनी यापुढे मान्यता प्राप्त विद्यापीठातून बीएस्सी (कृषी पदवी) रसायनशास्त्र विषयात पदवी पदविका डिप्लोमा किंवा समकक्ष राष्ट्रीयकृत संस्थेतून कमीत कमी सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधीचा कृषी निविष्ठा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे आवश्यक राहणार आहे. केंद्राच्या कृषी मंत्रालयाने या प्रकारचे राजपत्र प्रसिद्ध करण्यापूर्वी रासायनिक खताचा परवाना घेण्यासाठी केवळ तिसरी उत्तीर्ण असणे आवश्यक होते. तिसरी उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराने रासायनिक खताचे दुकान टाकल्यास त्याच्याकडून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन होण्याची अपेक्षा कशी काय करता येईल. याबाबत विचार करण्यात आला असावा. शेतीमध्ये मोठी आर्थिक गुंतवणूक शेतकऱ्यांना करावी लागते. गुंतवणूक केल्यानंतर त्यांना योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्यास उभे पिक पूर्णपणे वाया जाते.