एजन्सी मॅनेजरकडून विम्याच्या रकमेची अफरातफर
By Admin | Updated: December 25, 2015 01:01 IST2015-12-25T01:01:52+5:302015-12-25T01:01:52+5:30
एसबीआय लाईफ इंशुरन्स कंपनीच्या एजंसी मॅनेजरने ग्राहकांकडून घेतलेल्या विम्याच्या रकमेत अपहार केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

एजन्सी मॅनेजरकडून विम्याच्या रकमेची अफरातफर
एसबीआय इंशुरन्समधील प्रकार : फ्रेजरपुऱ्यात गुन्हा दाखल
अमरावती : एसबीआय लाईफ इंशुरन्स कंपनीच्या एजंसी मॅनेजरने ग्राहकांकडून घेतलेल्या विम्याच्या रकमेत अपहार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
संजय चांदपूरकर असे आरोपीचे नाव असून त्याने २ लाख ८७ हजार २४१ रुपयांचा अपहार करुन कंपनीची आणि ग्राहकांची फसवणूक केल्याची तक्रार एसबीआय लाईफ इंशुरन्स कंपनीच्या स्थानिक कार्यालयाचे व्यवस्थापक सुंदरनारायण जोशी यांनी दिली आहे. १७ पेक्षा अधिक ग्राहकांना आरोपी संजयने बनावट पावत्या दिल्या व रक्कम स्वीकारली.
येथील रुक्मिणीनगर परिसरात सन २००८ पासून एसबीआय लाईफ इंशुरन्सची शाखा कार्यरत असून विमा ग्राहकांकडून प्रिमियम गोळा केले जाते. त्यासाठी विविध लोक कार्यरत आहेत. या कार्यालयातून दरवर्षी ३ ते ४ कोटींचे विमा हप्ते गोळा केले जातात. सन २०१३ साली आरोपी संजय चांदपूरकर या विमा कंपनीत कंपनीत एजन्सी व्यवस्थापक म्हणून रुजू झाला. व्यवसायातून ग्राहकांशी त्यांचे संबंध जुळले. त्याच ओळखी आणि विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने पॉलिसीधारकांकडून रक्कम स्वीकारण्याकरिता बनावट पावत्या तयार केल्या. १७ हून अधिक ग्राहक २० आॅक्टोबर ते पुढील काळात त्याने या पावत्यांचा वापर करुन विमा प्रिमियमची रोख रक्कम स्वीकारली व ती रक्कम कंपनी वा ग्राहकांच्या खात्यात जमा न करता स्वत:च अपहार केला. याबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने त्यांच्या स्तरावर चौकशी करुन २२ आॅक्टोबरला फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनीही तब्बल २ महिने चौकशी केल्यानंतर २३ डिसेंबरला रात्री १०.३० वाजताच्या सुमारास तक्रार नोंदवून घेत संजय चांदपूरकर याच्याविरुद्ध कलम ४०६, ४६८, ४७१ भादंविअन्वये गुन्हा दाखल केला.