पुन्हा २४ तास संचारबंदी; खुनाचे दोन गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 06:00 IST2019-10-02T06:00:00+5:302019-10-02T06:00:37+5:30
पहिल्या घटनेतील मृत श्याम खोलापूरे (नंदवंशी) (३८, रा. महावीर चौक, शक्ती स्वीट मार्टलगत, परतवाडा) याच्या खुनाबद्दल मृताचा भाऊ शुभम नंदलाल नंदवंशी यांच्या फिर्यादीवरून आरोपी साजिद हेला, जावेद वहीद, शाहरूख, परवेज परू बेग, अण्णा व हर्शीदखाँ रहमतखाँ व एका अल्पवयीनासह सात जणांविरुद्ध भादंवि कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

पुन्हा २४ तास संचारबंदी; खुनाचे दोन गुन्हे
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : परतवाडा शहरात सोमवारी घडलेल्या खुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत, तर घटनेतील तीनही मृतांवर मंगळवारी पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार पार पडले. अंतिम संस्कारापूर्वी त्या मृतदेहाचे इनकॅमेरा शवविच्छेदन केले गेले. दरम्यान जुळ्या शहरात तणाव कायम असल्याने बुधवार दुपारपर्यंत संचारबंदी वाढविण्यात आली आहे.
पहिल्या घटनेतील मृत श्याम खोलापूरे (नंदवंशी) (३८, रा. महावीर चौक, शक्ती स्वीट मार्टलगत, परतवाडा) याच्या खुनाबद्दल मृताचा भाऊ शुभम नंदलाल नंदवंशी यांच्या फिर्यादीवरून आरोपी साजिद हेला, जावेद वहीद, शाहरूख, परवेज परू बेग, अण्णा व हर्शीदखाँ रहमतखाँ व एका अल्पवयीनासह सात जणांविरुद्ध भादंवि कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यात हर्शीदखाँ रहेमानखा याला पोलिसांनी अटक केली.
घटनेनंतर उसळलेल्या उपद्रवात मो. अतिक मो. रफीक व सैफ अली म. कमाल यांच्या मृत्यूप्रकरणात दुसरा गुन्हा सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास पोलिसांनी दाखल करून घेतला. यात मो. शफीक मो. रफीक (रा. नबाब मार्केट, परतवाडा) यांच्या फिर्यादीवरून महात्मा ठाकूर, शेरा, चेतन हिवरकर, कालू यादव, शुभम ऊर्फ बम नंदवंशी व इतर आठ ते दहा जणांविरुद्ध भादंवि कलम ३०२, ३२४, १४३, १४७, १४८, १४९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, मृतक सैफ अली मो. कलाम याच्या मृतदेहावर सोमवारी मध्यरात्रीनंतर अचलपूर मार्गावरील दर्गाह परिसरात पोलीस बंदोबस्तात दफनविधी करण्यात आला.
मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास मृत श्याम खोलापुरे (नंदवंशी) याचा मृतदेह अचलपूर उपजिल्हा रुग्णालयातून तगड्या बंदोबस्तात त्याचे राहते घरी आणला गेला. तेथून लगेच पोलीस बंदोबस्तात सकाळी १०.३० वाजता त्याची शवयात्रा काढली गेली. या शवयात्रेच्या पुढे खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन., अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक श्याम घुगे, अचलपूर उपविभागीय पोलीस अधिकारी पोपटराव अब्दागिरे यांच्यासह शंभर ते दीडशे पोलीस कायदा व सुव्यवस्था सांभाळून होते. या शवयात्रेत दोन ते अडीच हजार लोक सहभागी झाले होते. यादरम्यान हिंदू स्मशानभूमी परिसरातही तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास नमाजानंतर मृत मो. अतिक मो. रफीक यावर पोलीस बंदोबस्तात बैतूल रोडवरील मुस्लीम दफनभूमीत दफनविधी पार पाडला गेला. या अंत्ययात्रेदरम्यान विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे परतवाडा पोलीस ठाण्यात उपस्थित होते.
दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण दहा जणांना अटक करण्यात आली. त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पालकमंत्र्यांनी मंगळवारी दुपारनंतर शहराला भेट दिली.
दरम्यान, जुळ्या शहरांतील नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, बळी पडू नये, असे आवाहन आयजी मकरंद रानडे यांनी केले.
मंगळवारीही दगडफेक
मंगळवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास हबीबनगर, मुगलाईपुरा, स्वस्तिकनगर, नाईक प्लॉट परिसरात तणाव वाढला. जयस्तंभ, आठवडी बाजाराकडून शहरात येणारे रस्ते पोलिसांनी बंद केले. दगडफेक आणि शस्त्र काढल्याच्या ही घटना घडल्यात. आयजी मकरंद रानडे परत शहरात दाखल झाले. पोलिसांवर दगडफेक झाली. ५० दुचाकींवर १०० हेल्मेटधारी पोलीस दंडुके घेऊन फिरत आहेत.
अन्सार नगरातून १२ सशस्त्र व्यक्ती ताब्यात
घटनेनंतर अचलपूर, परतवाडा या दोन्ही शहरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. सीआरपीएफ, एसआरपीएफ, दंगा नियंत्रण पथकाच्या तुकड्या शहरात तैनात आहेत. दोन्ही शहरांना पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मृतदेहाचे अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात डॉ. मडावी, डॉ. मिराज अली व डॉ. जवंजाळ या अधिकाऱ्यांनी इनकॅमेरा शवविच्छेदन केले. शहरातील संचारबंदी बुधवारी दुपारपर्यंत राहील. दरम्यान मंगळवारी रात्री अन्सार नगर भागातून १२ सशस्त्र व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले.