तीन महिन्यांनंतर अधिसूचनेला लाभला मुहूर्त
By Admin | Updated: July 24, 2016 00:05 IST2016-07-24T00:05:06+5:302016-07-24T00:05:06+5:30
शहरातील वाढती वाहनाची संख्या व अपघाताचे वाढते प्रमाण बघता वाहतुकीसंदर्भात नियोजन करणे अत्यावश्यक होते.

तीन महिन्यांनंतर अधिसूचनेला लाभला मुहूर्त
अधिसूचना जाहीर : सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत जड वाहतुकीस बंदी
अमरावती : शहरातील वाढती वाहनाची संख्या व अपघाताचे वाढते प्रमाण बघता वाहतुकीसंदर्भात नियोजन करणे अत्यावश्यक होते. मात्र, या नियोजन प्रक्रियेला विविध कारणास्तव विलंब झाला आहे. तब्बल तीन महिन्यांनंतर वाहतूक नियोजनाला मुहूर्त मिळाला आहे. पोलीस विभागातर्फे वाहतूक नियोजनासंदर्भात शुक्रवारी अंतिम अधिसूचना जारी करण्यात आली. यामध्ये जड वाहनांना सकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत वाहतुकीस बंदी घातली आहे. यादरम्यान ठराविक वेळेत वाहनांना प्रवेश घेण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
शहरात २०११ ते २०१५ या कालावधीत २ हजार ६२३ अपघात घडले. त्यामध्ये ३७१ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व सुरक्षित रहावी, या उद्देशाने २७ एप्रिल रोजी प्रस्तावित अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यानुसार आक्षेप व सूचना प्राप्त झाल्यानंतर ११ व १८ जुलै रोजी नागरिक, लोकप्रतिनीधी व ट्रकमालक संघटना, आरटीओ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. नियोजनातून अधिसुचना जारी करण्यात आली.
या मार्गावर जड वाहतूकीला बंदी
अमरावती : यामध्ये शहरात येणाऱ्या जड वाहतुकीला प्रतिबंध घालण्यात आला आहे. मात्र, काही मार्गाने वेळेच बंधन ठेवून वाहतूक करण्यास सूट देण्यात आली आहे. गिट्टी, बोल्डर, रेती, मुरुम, मलबा, डांबरची वाहतूक करणाऱ्या वाहनांना सकाळी ८ ते १०, दुपारी २ ते ४.३० व ६.३० वाजता या वेळेदरम्यान जुना बायपासचा वापर करता येईल. परंतु गांधी चौक ते रविनगर, गांधी चौक ते राजापेठ, गांधी चौक ते अंबागेट मार्ग, बजरंग टेकडी ते विलास नगर, पटवा चौक या मार्गावर वाहतूक करण्यास प्रतिबंध राहणार आहे. (प्रतिनिधी)
अंतर्गत रस्त्यांवर वाहन उभे करता येणार नाही
शहरातील अंतर्गत मार्गावर सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत जड व हलके वाहन उभे करता येणार नाही. यामध्ये ४०७, ७०९, गिट्टी-बोल्डर टॅक, रेती ट्रक या वाहनांना बंदी राहणार आहे.
२० ते ३० किमी. गतीची मर्यादा
शहरात वाहतूक करणाऱ्या सर्व जड वाहनांना २० ते ३० किमि. गतीची क्षमता ठेवता येणार आहे. ज्या वाहनांना मालाची चढउतार करण्याची आवश्यकता नाही, अशा जड वाहनांना २४ तास प्रवेश बंदी राहणार आहे. त्यांना केवळ सुपर एक्सप्रेस व रींगरोडचा वापर करता येईल.
वाहतूक करण्यास प्रतिबंधित मार्ग
शहरात सर्व जड व हलकी मालवाहू वाहनांना सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रवेश बंदी राहणार आहे. तसेच सर्व जड वाहनांना जुना बायपास येथून वाहतूकीस प्रतिबंध लावण्यात आला आहे.
जीवनावश्यक वस्तुंच्या वाहतुकीला वेळेचे बंधन
शहरातून जीवनावश्यक अतिमहत्त्वाच्या वस्तुंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना वेळेचे बंधन घालून वाहतुकीसस सूट देण्यात आली आहे. त्यामध्ये बडनेराकडून जुन्या बायपासने येणाऱ्या जड वाहनांना एमआयडीसीपर्यंत येता येईल. सकाळी ८ ते १०, दुपारी २ ते ४.३० व ६.३० वाजतानंतरच्या वेळेत वाहनांना एमआयडीसी कार्यालयापर्यंत येता येईल. तेथून शहरात जाण्यासाठी प्रतिबंध राहील. एमआयडीसी कार्यालय ते आशियाना चौकपर्यंत सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रतिबंध राहील. मालधक्का बडनेरा येथून वाहतूक करणाऱ्या जडवाहनांनी बगिया टी पाईंट येथूत सुपर एक्सपे्रस हायवेवर जाऊन गौरी इन-रहाटगाव मार्गाचा अवलंब करावा लागेल. बडनेराकडून सातुर्णा एमआयडीसीकडे येणाऱ्या जड वाहनांना सकाळी ८ ते १०, दुपारी २ ते ४.३० व ६.३० वाजता या वेळेत येता येईल.
सुरळीत, सुरक्षित वाहतुकीसाठी अधिसूचना काढली असून २५ जुलैपासून अमलात येईल. या अधिसूचनेचे उल्लंघन केल्यास मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.
- मोरेश्वर आत्राम,
पोलीस उपायुक्त.