गांजा, एमडीनंतर पकडले ‘चरस’ ; नागपुरी गेट पोलिसांची कारवाई, पेडलरला अटक
By प्रदीप भाकरे | Updated: September 15, 2025 17:52 IST2025-09-15T17:49:13+5:302025-09-15T17:52:36+5:30
Amravati : आरोपीकडून मोबाईल व चरस असा एकुण ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र त्याचवेळी एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला.

After ganja, MD, 'charas' seized; Nagpuri Gate police take action, peddler arrested
अमरावती: नागपुरी गेट पोलिसांनी गांजा व एमडीच्या सातत्यपुर्ण कारवाईनंतर नागपुरच्या एका पेडलरकडून ९८० ग्रॅम चरस जप्त केले. १४ सप्टेंबर रोजी रात्री पठान चौक भागात ही कारवाई करण्यात आली. प्रतिक प्रभाकर पुनटकर (२४, रा. बँक ऑफ इंडिया जवळ गोंडखोरी नागपुर) असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून मोबाईल व चरस असा एकुण ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र त्याचवेळी एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला. यामिन खान युसुफ खान (रा. कोंढाळी, नागपूर) असे फरार आरोपीचे नाव आहे. दोघांविरूद्ध नागपुरी गेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पठाण चौक परिसरातील कमानीजवळ दोन जण एका स्कूल बॅगमध्ये अमली पदार्थ बाळगून विक्रीकरिता उभे असल्याची माहिती नागपुरी गेट पोलिसांना मिळाली. त्या आधारे सहायक पोलिस निरीक्षक वैशाली चव्हान व नवनियुक्त डीबी पथकाने पठाण चौक गाठले. त्यावेळी दोन इसम संशयास्पदरित्या उभे असल्याचे दिसून आले. पोलिसांची चाहूल लागताच त्यातील एक जण तेथून पसार झाला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. मात्र, त्याचा पत्ता लागला नाही. दरम्यान, त्यातील एक जण स्कूल बॅगसह पोलिसांच्या हाती लागला. चौकशीत त्याने आपली ओळख प्रतिक पुनटकर अशी दिली. त्याच्याजवळील स्कूल बॅगची पाहणी केल्यावर त्यात २ लाख ८५ हजार रुपये किमतीचे ९८० ग्रॅम चरस आढळून आले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई नागपुरी गेटचे ठाणेदार हनुमंत उरलागोंडावर यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक गजानन विधाते, डीबी पथक प्रमुख राजेंद्र पिंपळे, शफीक शेख, कुणाल बरडे, शेखर गायकवाड यांच्यासह जुन्या डीबी पथकातील अंमलदार दानिश शेख, राहुल रोडे, सागर पंडित यांनी केली. भांगेच्या वनस्पतीतल्या चिकट पदार्थाला राळ म्हणतात. यापासून चरस बनवला जातो. त्यासाठी भांगेची फुलं हाताने रगडली जातात. त्यामुळे काळा थर जमा होतो. या थराचा वापर चरस म्हणून केला जातो.