अखेर 'त्या' मोराची प्राणज्योत मालवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 23:33 IST2018-05-21T23:33:22+5:302018-05-21T23:33:22+5:30
छत्रीतलाव परिसरात भटक्या श्वानांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मोराचा अखेर उपचारादरम्यान सोमवारी सकाळी मृत्यू झाला. वन्यजीव छायाचित्रकारांच्या प्रसंगावधानामुळे तो मोर श्वानांच्या शिकारीतून बचावला होता.

अखेर 'त्या' मोराची प्राणज्योत मालवली
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : छत्रीतलाव परिसरात भटक्या श्वानांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मोराचा अखेर उपचारादरम्यान सोमवारी सकाळी मृत्यू झाला. वन्यजीव छायाचित्रकारांच्या प्रसंगावधानामुळे तो मोर श्वानांच्या शिकारीतून बचावला होता.
रविवार सुटीचा दिवस असूनही सरकारी दवाखान्यातील पशूशल्य चिकित्सक अनिल कळमकर यांनी त्या जखमी मोराची तपासणी केली होती. त्यानंतर पुढील उपचाराकरिता वसाकडे सुपूर्द करण्यात आले. मात्र, रविवार रात्री ९.३० मिनिटांनंतर मोराची प्रकृती ढासळाली. श्वानांच्या हल्ल्यातील जखमी मोराने २३ तास मृत्यूशी झुंज दिली. मात्र, काळाने त्यावर झडप घातली. याची माहिती वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी काजी यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात मोराला शवविच्छेदनकरिता पशू शल्य चिकित्सालयात पाठविण्यात आले. पशु वैद्यकीय अधिकारी कुळकर्णी यांनी मृत मोराचे शवविच्छेदन केले आणि त्यानंतर त्यावर वडाळी वनपरिक्षेत्रात वसाचे पक्षिमित्र भूषण सायंके, गणेश अकर्ते, वनपरिक्षेत्र अधिकारी काजी, वनमजूर किशोर डहाके आणि सर्पमित्र शुभम सायंके यांच्यासमक्ष अंतिम संस्कार करण्यात आले.