१२ वर्षांनंतरही उपजिल्हा रुग्णालयाची समस्या कायम
By Admin | Updated: June 21, 2016 00:15 IST2016-06-21T00:15:08+5:302016-06-21T00:15:08+5:30
उपजिल्हा रुग्णालय स्थापन होऊन एक तपापेक्षा अधिक दिवस उलटल्यावरही रुग्णांच्या गैरसोईचा पाढा सुरूच आहे.

१२ वर्षांनंतरही उपजिल्हा रुग्णालयाची समस्या कायम
रुग्ण त्रासले : उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार अंदाधुंद
सुनील देशपांडे अचलपूर
उपजिल्हा रुग्णालय स्थापन होऊन एक तपापेक्षा अधिक दिवस उलटल्यावरही रुग्णांच्या गैरसोईचा पाढा सुरूच आहे. या दवाखान्याचा अंदाधुंद कारभार पाहता याला कुणी वाली आहे की नाही, असा प्रश्न जनतेत निर्माण झाला आहे.
अचलपूर तालुक्यातील जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी तत्कालीन पालकमंत्री वसुधाताई देशमुख यांच्या प्रयत्नाने जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने, महाराष्ट्र आरोग्य सेवा विकास प्रकल्प कार्यक्रम अंतर्गत २००३ मध्ये अचलपूर येथे उपजिल्हा रुग्णालय बांधण्यात आले. या दवाखान्याचे उद्घाटन १२ सप्टेंबर २००३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते व तत्कालीन आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांचे अध्यक्षतेखाली झाले होते. प्रमुख उपस्थिती वसुधाताई व तत्कालीन नगराध्यक्ष हाजी मो.रफीक शेख गुलाब, प्रकल्प आयुक्त रमेशचंद्र कानडे, महासंचालक, आरोग्य संचालनालय डॉ.सुभाष यांची उपस्थिती होती.
मागील तीन वर्षांपासून तर या रुग्णालयात अंदाधुंद कारभार सुरू असल्याने रुग्णांचे हाल होत आहे. वैद्यकीय अधीक्षक मो.जाकीर यांचे उपजिल्हा रुग्णालयाकडे दुर्लक्ष होत असल्याने अस्वच्छता, परिचारीकांचा व कर्मचाऱ्यांचा रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक, दवाखान्यातील व परिसरातील असलेले घाणीचे साम्राज्य औषधांचा तुटवडा अशा प्राथमिक समस्याही सुटलेल्या नसून वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही मनमानी वाढली आहे.
कार्यमुक्त केल्याने ड्युटीचा प्रश्न
अगोदरच येथील दवाखान्यात परिचारिकांची कमतरता आहे. त्यात काही परिचारिकांची बाहेरगावी बदली झाली आहे. बदली झालेल्या परिचारिकांना अधिपरिचारिकांची व्यवस्थापन अधिकारी डॉ.मेराज अली व मेटू यांना अंधारात ठेवून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कार्यमुक्त केल्याने त्यांच्या ड्युटी कशा लावाव्यात, हा प्रश्न त्यांना निर्माण होतो अशी माहिती आहे.
बगिच्याचा एका बाजूला ते टाके असून तेथे सांडपाणी व टाक्याचे पाणी आहे. त्यातील पाण्याची कायमची विल्हेवाट लागावी, यासाठी आरोग्य मंत्र्यांकडे निधीचा प्रस्ताव पाठवला आहे. तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागालाही पत्र दिले आहे. परिचारिकांना आरोग्य संचालकांच्या आदेशाने कार्यमुक्त केले आहे. मी वेळोवेळी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेत असतो. मनाने कोणताच निर्णय घेत नाही.
- मो.जाकीर,
वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय