संत्राबागांना ताण देण्याचे काम प्रभावित
By Admin | Updated: January 3, 2015 00:27 IST2015-01-03T00:27:17+5:302015-01-03T00:27:17+5:30
जिल्ह्यात मागील आठवड्यापासून कडाक्याच्या थंडीची लाट आणि दोन दिवसांपासून अवकाळी पावसाचे आगमण झाल्याने संत्रा व तूर पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.

संत्राबागांना ताण देण्याचे काम प्रभावित
अमरावती : जिल्ह्यात मागील आठवड्यापासून कडाक्याच्या थंडीची लाट आणि दोन दिवसांपासून अवकाळी पावसाचे आगमण झाल्याने संत्रा व तूर पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी संत्रा बागांना ताण देणे सुरु केले होते. परंतु अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची घोर निराशा केली.
नांदगाव खंडेश्वरमध्ये तुरीचे नुकसान
तालुक्यात रबी हंगामात गहू ४ हजार २४९ हेक्टर, हरभरा ५ हजार १४० हेक्टर, सूर्यफूल २ हेक्टर, करडी ४ हेक्टर, जवस १ हेक्टर, मोहरी ४ हेक्टर, चारापिके ५० हेक्टर , संत्रा ८७४ हेक्टर आहे. तसेच १० हजार ७६ हेक्टर तूर व ६ हजार ९५९ हेक्टर कपासीचा पेरा आहे. उशीरा फुलोऱ्यावर येणाऱ्या तुरीच्या पिकाला या अवकाळी पावसाचा फायदा होण्याची शक्यता आहे. पण शेंगा भरलेल्या तुरीचे नुकसान होण्याची भीती आहे. कोरडवाहू कपाशीला हा पाऊस फायद्याचा ठरणार आहे.
चांदूररेल्वेमध्ये आंबियाचे नुकसान
तालुक्यात अवकाळी पावसामुळे संत्रा, कापूस व तूरा पिकाचे नुकसान होत आहे. सद्यस्थितीत तूर पीक काढणीवर आले असताना पावसाचा मारा होऊन या पिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कापूस वेचणीची तयारी सुरु असताना पावसाचे आगमण झाल्याने कापूस जमिनीवर आला आहे. डिसेंबरच्या अखेरच्या पंधरवाड्यात आंबिया बहराचे पीक घेण्यासाठी संत्रा ताणावर सोडण्यात येतो. परंतु या भागातील संत्रा उत्पादकांनी संत्रा झाडे ताणावर सोडताच पाऊस आल्याने मोठे नुकसान झाले.
अंजनगाव मंडळात १२६ मिली पाऊस
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने व कडाक्याच्या थंडीने जनजीवन विस्कळीत झाले असून अंजनगाव मंडळात गेल्या दोन दिवसांत तब्बल १२६ मिमी पावसाची नोंद झाली. दोन दिवसांत कापूसतळणी मंडळात ९७ मिमी, विहिगाव मंडळात ९१ मिमी, सातेगाव मंडळात ७४ मिमी व कोकर्डा मंडळात ८८ मिमी पावसाची नोंद झाली. संत्राबागामध्ये ताण देण्याचे काम थंडावले आहे. उन्हाळ्यातील बार फुटण्यासाठी आवश्यक हवामान या पावसामुळे नष्ट झाल्याने ताण देण्याचे काम प्रभावित झाले आहे. सोबतच उशिरा पेरलेल्या तुरीचा फुलोर पक्का होऊन त्याला शेंगा धरण्याची शक्यता मावळली आहे.
तिवसामध्ये अळीचा प्रादुर्भाव
तालुक्यात ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस रबीच्या गहू हरभऱ्याला पोषक आहे. परंतु धुके व ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. कपाशी पिकाच्या खोडव्याला या पावसाने फायदा झाला असून हंगाम लांबणीवर पडणार आहे.
धामणगावात सहा हजार हेक्टरमध्ये तूर पिकाचे नुकसान
अवकाळी पावसाचा फटका सह हजार हेक्टर क्षेत्रातील तूर पिकाला बसला आहे़ एक हजार हेक्टरमधील हरभरा पीक फुलावर असताना अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे हरभऱ्याचा खारवटपणा पूर्णत: कमी झाला आहे़ तूर पूर्णत: ओली झाल्यामुळे काही दिवस पाऊस सतत राहिल्यास या पिकाला मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे़ मागील दोन महिन्यांपूर्वी १ हजार हेक्टरमध्ये हरभऱ्याची लागवड करण्यात आली होती़ हरभऱ्याचा खारवटपणा या पावसाने गेल्यामुळे आगामी काळात होणारे हे पीक धोक्यात आले आहे़ दोन दिवस ढगाळ वातावरण राहिल्यास हरभऱ्यावर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे़ कीड रोग नियंत्रणाचे व्यवस्थापन शेतकऱ्यांनी करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी एसक़े़ सत्यवाण यांनी केले आहे़
मोर्शीत २३.६२ मि.मी. पाऊ स
मोर्शी तालुक्यात सुरु झालेल्या पावसाने दुसऱ्या दिवशीही दमदार हजेरी लावली. दोन दिवसांत रिध्दपूर महसूल मंडळात १०३ मिमी पाऊस बरसला. शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत मोर्शी तालुक्यात सरासरी २३.६२ मिमी पाऊस पडला.
रिध्दपूर महसूल मंडळात पहिल्या दिवशी ४०.४ मिमी तर दुसऱ्या दिवशी ६३.४ मिमी असे दोन दिवसांत तालुक्यात सर्वाधिक १०३.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आंबिया बहराच्या संत्र्याला योग्य बाजारभाव नसल्यामुळे अनेक बागायतदारांनी संत्री विकला नाही. परिपक्व झालेली संत्री अजूनही बागेतच आहे. पावसामुळे अशी संत्री झाडावरुन गळण्याची शक्यता आहे. याशिवाय बागायतदारांनी येत्या आंबिया बहराकरिता संत्राबागांना तडण देणे सुरु केले होते, पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे संत्राबागांना पुरेसा कालावधी तडणाकरिता मिळणार नाही. त्यामुळे आंबिया बहरावर त्याचा परिणाम होईल, अशी शक्यता बागायतदारांकडून वर्तविण्यात आहे. (प्रतिनिधी)
शेतातील कडबा-कुटाराचे ढिगारे भिजले
पावसामुळे शेतातील वेचा न झालेला कापूस भिजल्यामुळे त्याची प्रत घसरेल. कापसाची परिपक्वझालेली बोंडं फुटण्यास पावसाळी वातावरणामुळे वेळ लागेल. शेतात गंजी लावून ठेवलेले कडबा, कुटाराचे ढीग पावसात ओले झाले. आणखी पाऊस बरसल्यास या गंजी सडतील. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचे नुकसान होईल. हलक्या जमिनीतील कोरडवाहू तुरीच्या शेंगा परिपक्वहोऊन त्या काढणीला आल्या आहेत, पावसामुळे त्याचे नुकसान होण्याची भीती वर्तविली जात आहे. ओलिताच्या तुरीवर आणि लवकर पेरणी झालेल्या व घाट्यावर आलेल्या हरभरा पिकावर ढगाळ वातावरणामुळे अळया पडण्याची शक्यता असल्याचे तालुका कृषी अधिकारी गावंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.