मेळघाटात रंगला आदिवासींचा थाट्या बाजार
By Admin | Updated: October 30, 2014 22:44 IST2014-10-30T22:44:14+5:302014-10-30T22:44:14+5:30
सातपुड्यातील पर्वतरांगामध्ये वसलेल्या मेळघाटच्या आदिवासी खेड्यांमध्ये गुरुवारपासून थाट्या बाजाराची धूम सुरु झाली आहे. मुख्य बाजारात बासरीच्या स्वरांवर आदिवासींचे पात्र पारंपरिक नृत्यावर थिरकले.

मेळघाटात रंगला आदिवासींचा थाट्या बाजार
नरेंद्र जावरे - चिखलदरा
सातपुड्यातील पर्वतरांगामध्ये वसलेल्या मेळघाटच्या आदिवासी खेड्यांमध्ये गुरुवारपासून थाट्या बाजाराची धूम सुरु झाली आहे. मुख्य बाजारात बासरीच्या स्वरांवर आदिवासींचे पात्र पारंपरिक नृत्यावर थिरकले.
‘थाट्या’ म्हणजे गुराखी. जंगलात गुरे चारणारे मेळघाटातील थाट्या वर्षभर दिवाळीची वाट पाहतात. ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता पाळीव जनावरांची काळजी घेणारे थाट्या दिवाळीनंतरच्या पाच दिवस मात्र स्वत:चा उत्सव साजरा करतात. या पाच दिवसांत ते गुरे चारत नाहीत. मात्र, गोधनाच्या दिवशी गुरांना सजवितात. मेळघाटात हरिसाल, चुरणी, काटकुंभ हातरु आदी गावांमध्ये थाट्या बाजार परिसरातील गुरे चारणारे थाट्या दरवर्षीप्रमाणे एकत्र येऊन पारंपरिक नृत्य सादर करतात. बाजार लईनह ‘जांगडी’ (शहरी माणूस) व पशुपालकांकडून काही रोख रक्कम ते घेतात. सायंकाळी एकूण जमा रकमेचा हिशेब झाला की ठरल्याप्रमाणे गाव शिवारावर जेवणावळ होते. पाच ते आठ फुटांची बासरी अन् त्यामधून उमटणारे स्वर, ढोलकीवर पडणारी थाप मंत्रमुग्ध करणारी असते. आदिवासी पाड्यांमध्ये दिवाळीच्या फटाक्यासह नाचगाण्यांचा सराव थाट्या बाजार सादरीकरणाची परंपरा अद्यापही कायम आहे.