१६ लाखांसाठी अडले फिडर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 05:01 IST2020-08-28T05:00:00+5:302020-08-28T05:01:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चिखलदरा : चौऱ्यामल गावाला नजीकच्या अडीच किलोमीटर अंतरावरून शहानूर धरणानजीकच्या विहिरीतून पाणी पुरवठा होतो. त्या विहिरीवर ...

१६ लाखांसाठी अडले फिडर
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : चौऱ्यामल गावाला नजीकच्या अडीच किलोमीटर अंतरावरून शहानूर धरणानजीकच्या विहिरीतून पाणी पुरवठा होतो. त्या विहिरीवर दहा एचपीचे दोन मोटरपंप आहेत. विद्युत पुरवठयाअभावी ते कुचकामी ठरले आहेत. विद्युत विभागाने गाव फिडर वरून पुरवठा करण्यासठी १६ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. एवढी रक्कम ग्रामपंचायतीकडे नसल्याने तो निधी जिल्हा नियोजन समितीने द्यावा, अशी मागणी आहे.
तर दुसरीकडे कोट्यवधी रुपयांचा आदिवासी विकासाच्या नावावर येणारा निधी इतरत्र वळविलो जातो. त्या लोकप्रतिनिधींना तहानलेले आदिवासी दिसू नयेत, यावर आश्चर्य व्यक्त होत आहे. चौऱ्यामल गावात विहीर आहे. विहिरीत भरपूर पाणी सुद्धा आहे. विहिरीवर मोटर पंप आहे. पाणी साठवणूक करण्यासाठी पाण्याची टाकी सुद्धा आहे. टाकीत पाणी चढविण्यासाठी विद्युत पुरवठा सुद्धा करण्यात आला आहे. मात्र तरीसुद्धा हे गाव तहानले असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने लोकदरबारात मांडले आहे. वीज पुरवठा चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याने डोळ्यादेखत पाणी असतानाही आदिवासींना नदी नाल्याचे गढूळ पाणी प्यावे लागत आहे. यासंदर्भात अनेकदा पत्रव्यवहार करूनही महावितरण प्रशासन् काही ऐकत नाही. जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दयाराम काळे, सरपंच राजेश जावरकर यांनी साकडे घातले आहे. तर खोज समाजिक संस्थेचे बंड्या साने व आदिवासी नागरिकांनीही येथील पाणीटंचाईचा मुद्दा उचलून धरला आहे.
पालकमंत्र्यांना फक्त एवढीच मागणी
पावसाळ्यात संपुर्ण गावाला डोक्यावर हंडे घेऊन पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नदीनाल्यातील गढूळ पाणी घेऊन गाव गाठावे लागते. यात घरातील जेष्ट, बालक, तरूण, तरूणीला पायपीट करावी लागत आहे. गढूळ पाणी पिऊन अतिसार होण्याची भीती आहे. कृषीपंपाच्या फिडरवरचा पाणीपुरवठा गावठाण फिडरवर करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांचे कान टोचावे आणि आम्हाला पाणी द्यावे, अशी मागणी सरपंच राजेश जावरकर यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.