अतिरिक्त एफएसआय लागू होणार
By Admin | Updated: May 29, 2015 00:34 IST2015-05-29T00:34:19+5:302015-05-29T00:34:19+5:30
महापालिका उत्पन्नात वाढ करण्यासाठी शहरात अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) लागू करण्याबाबत सांगोपांग चर्चा झाली.

अतिरिक्त एफएसआय लागू होणार
अमरावती : महापालिका उत्पन्नात वाढ करण्यासाठी शहरात अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) लागू करण्याबाबत सांगोपांग चर्चा झाली. परंतु एफएसआय कोणत्या दराने मंजूर करावे, यासाठी बिल्डर्स व्यावसायीक, वास्तुशिल्पकार, तज्ज्ञांशी चर्चा करून शहरवासियांचा विचार करुनच दर ठरविण्याचा निर्णय गुरुवारी विशेष सभेत घेण्यात आला. याविषयावर पुन्हा विशेष सभा होईल, असे निर्देश महापौरांनी दिलेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महापौर चरणजितकौर नंदा यांच्या पीठासीनाखाली विकास नियंत्रण नियमावलीमध्ये अधिमूल्य आकारुन अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांक अनुज्ञेय करण्याबाबत विशेष सभेचे आयोजन गुरुवारी करण्यात आले. या सभेला प्रभारी आयुक्त जिल्हाधिकारी किरण गित्ते, नगरसचिव मदन तांबेकर उपस्थित होते. नगरविकास विभाग, मंत्रालयाने मंजूर केलेला वाढीव एफएसआय लागू करण्याबाबतच्या शासकीय प्रस्तावावर चर्चा करण्यात आली.
यावेळी महापालिका उत्पन्नात वाढ करण्याच्या अनुषंगाने मुद्दे मांडताना स्थायी समिती सभापती विलास इंगोले, पक्षनेता बबलू शेखावत, गटनेता अविनाश मार्डीकर, नगरसेवक दिगंबर डहाके, बाळासाहेब भुयार, अजय गोंडाने, प्रदीप बाजड, प्रवीण हरमकर, वसंतराव साऊरकर, अरुण जयस्वाल, संजय अग्रवाल, चेतन पवार, विजय नागपूरे, जयश्री मोरे, मिलिंद बांबल, सुजाता झाडे, दीपक पाटील, भूषण बनसोड, सुनील काळे, हमीद शद्दा, अर्चना इंगोले आदी सदस्यांनी काही तांत्रिक मुद्दांवर बोट ठेवले. वाढीव एफएसआय मंजूर करताना शहरातील नागरिकांच्या क्रयशक्तीचा विचार करुनच अतिरिक्त बांधकामाला दर लागू करावेत, अशा सूचना केल्या. दरम्यान जिल्हाधिकारी गित्ते यांनी कोल्हापूर महापालिकेने एफएसआय लागू केल्याने उत्पन्नात १०० ते १२० कोटींची वाढ झाल्याचे उदाहरण दिले. परंतु नवीन एफएसआय लागू करताना दर निश्चत करणे आवश्यक असल्याचे सदस्यांचे म्हणणे होते.
वाढीव चटईक्षेत्र निर्देशांक अनुज्ञेय नियमावली लागू करताना रेडिरेकनर नुसार दर आकारले जात असतील तर ही बाब नागरिकांवर अन्यायकारक असल्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण हरमकर यांनी सांगितले. दरम्यान सोलापूरच्या धर्तीवर एफएसआय लागू करताना काही तज्ज्ञांचे अभिप्राय मागवूनच पुढील निर्णय घ्यावा, असा सूर सदस्यांनी लावून धरला. परिणामी महापौर नंदा यांनी याविषयावर लवकरच गटनेता, विरोधीपक्षनेता, बांधकाम व्यावसायिक, वास्तुशिल्पकार, तज्ज्ञांची बैठक घेण्याचे ठरविले. पुढील महिन्यात विशेष सभा घेऊन वाढीव एफएसआय मंजूर केला जाईल, असा निर्णय ही सभा स्थगित करताना घेण्यात आला. (प्रतिनिधी)