अभिनेत्री कंगना यांच्या कार्यालयाचे बांधकाम पाडण्याची कारवाई सूडबुद्धीची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 17:40 IST2020-09-09T17:38:08+5:302020-09-09T17:40:16+5:30
कंगना राणावत यांनी जे वक्तव्य केले त्याचा सूड उगविण्यासाठी राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या सांगण्यावरून ही कारवाई झाल्याचा आरोप खासदार नवनीत रवी राणा यांनी केला आहे.

अभिनेत्री कंगना यांच्या कार्यालयाचे बांधकाम पाडण्याची कारवाई सूडबुद्धीची
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: आज मुंबई महानगर पालिकेच्या पथकाने अभिनेत्री कंगना राणावत यांचे कार्यालय अनधिकृत म्हणून पाडले. अनेक वर्षांनंतर मनपाने ही कारवाई केली. कंगना राणावत यांनी जे वक्तव्य केले त्याचा सूड उगविण्यासाठी राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या सांगण्यावरून ही कारवाई झाल्याचा आरोप खासदार नवनीत रवी राणा यांनी केला आहे. कंगनाने वक्तव्य केले त्याविरुद्ध कठोर कायदेशीर कार्यवाही करावी, संजय राऊत यांनी एका महिलेबद्दल अभद्र शब्दप्रयोग केला आहे, हा संपूर्ण महिला वर्गाचा अपमान आहे व याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी खासदार नवनीत रवी राणा यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्री बंगल्यावर बसून कारभार चालवू नये.पूर्व विदर्भात भयानक पूरपरिस्थिती आहे. भंडारा-गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्याचे पीक उध्वस्त झाले आहे. बेरोजगार तरुण तरुणी रोजगारासाठी भटकत आहेत. एक ना अनेक प्रश्न राज्याला भेडसावत आहेत. कोरोना महामारीमुळे जनता त्रस्त आहे. सगळ्यात जास्त कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. हॉस्पिटल मध्ये जागा नाही,आॅक्सिजन सिलेंडर नाहीत, मृत्यू वाढत आहेत या गंभीर समस्यांवर तोडगा काढण्याऐवजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या मातोश्री निवासस्थानी आराम करीत आहेत व त्यांचे खासदार संजय राऊत हे खुलेआम महिलांचा अपमान करीत आहेत. मुख्यमंत्री निमूटपणे हा प्रकार बघून त्यांना पाठीशी घालत आहेत. हे सर्व अतिशय निंदाजनक असून जनतेच्या भावनांचा अपमान करणारे आहे.
मुख्यमंत्र्यांचे या वक्तव्याला समर्थन असल्यास त्यांनी तसे जाहीर करावे किंवा समर्थन नसल्यास मुख्यमंत्री महोदयांनी संजय राऊत यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. सोबतच मुखमंत्र्यांनी राज्याचा प्रमुख म्हणून आपले कर्तव्य प्रत्यक्ष मैदानात उतरून पार पाडावे असा सल्ला सुद्धा खासदार राणा यांनी दिला आहे. विदर्भातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याची पिके वाहून गेली,घरेदारे पडली, गुरेढोरे वाहून गेली या सर्वांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही खासदार राणा यांनी केली आहे.