दिव्यांग मतदानाच्या टक्केवाढीसाठी ‘अॅक्शन प्लॅन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 21:36 IST2019-03-27T21:35:30+5:302019-03-27T21:36:24+5:30
लोकसभा निवडणुकीत हळूहळू रंगत येऊ लागली आहे. उमेदवारांचे नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया संपुष्टात आली. आता किमान ७५ टक्क्यापेक्षा जास्त मतदान व्हावे, अशी तयारी जिल्हा निवडणूक कार्यालयाने चालविली आहे. त्यानुसार विविध उपक्रम, कार्यक्रमाद्वारे मतदान जनजागृती मोहीम सुरू आहे. याच धर्तीवर दिव्यांगांचे मतदान टक्केवाढीसाठी ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला. त्यांना ईव्हीएम, व्हीव्हीपॅटचे प्रशिक्षण देण्याचा कृती कार्यक्रम आखला जात आहे.

दिव्यांग मतदानाच्या टक्केवाढीसाठी ‘अॅक्शन प्लॅन’
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लोकसभा निवडणुकीत हळूहळू रंगत येऊ लागली आहे. उमेदवारांचे नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया संपुष्टात आली. आता किमान ७५ टक्क्यापेक्षा जास्त मतदान व्हावे, अशी तयारी जिल्हा निवडणूक कार्यालयाने चालविली आहे. त्यानुसार विविध उपक्रम, कार्यक्रमाद्वारे मतदान जनजागृती मोहीम सुरू आहे. याच धर्तीवर दिव्यांगांचे मतदान टक्केवाढीसाठी ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला. त्यांना ईव्हीएम, व्हीव्हीपॅटचे प्रशिक्षण देण्याचा कृती कार्यक्रम आखला जात आहे.
मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य मानले जाते. यंदा लोकसभा निवडणुकीत प्रशासनाने मतदानाच्या टक्केवाढीकडे अधिक लक्ष दिले आहे. विशेषत: महिला, युवा मतदारांनी मोठ्या संख्येने लोकशाहीच्या या कुंभमेळ्यात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक विभागाने केले आहे. मात्र, मतदानाच्या दिवशी १८ एप्रिल रोजी अपंग विद्यार्थ्यांना मतदानासाठी प्रेरित करण्याकरिता शाळा, महाविद्यालयांत विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जात आहे. दिव्यांग मतदार सेलचे प्रमुख सुनील वारे यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविला जात आहे. महानगरातील दिव्यांगांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना मतदान करण्याचे आवाहनदेखील केले जात आहे. दिव्यांगांचा मतदार नोंदणी ते मतदान प्रक्रियेत सहभाग असा प्रवास निवडणूक विभागाकडून सुरू आहे.
दोन दिवस प्रशिक्षण
निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर नियोजनानुसार २८ मार्च रोजी सकाळी ११ ते १ वाजता मार्डी मार्गावरील राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था आणि वडाळी कॅम्प येथील आश्रित अंध कर्मशाळेत दुपारी १ ते ३ या दरम्यान तर, दुपारी ४ ते ६ वाजता दरम्यान फरशी स्टॉप येथील प्रयास मतीमंद विद्यालयात दिव्यांगांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. २९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता रहाटगाव येथील वसंतराव नाईक अपंग कर्मशाळा येथे तर, दुपारी १ वाजता साईनगर येथील बुलीदान राठी मूकबधिर विद्यालयात दिव्यांग विद्यार्थ्यांना मंडळ अधिकारी, तलाठी हे ईव्हीएम, व्हीव्हीपॅट हाताळणीचे प्रशिक्षण देतील.
सामान्य मतदारांप्रमाणे दिव्यांग मतदारही निवडणूक प्रक्रियेतून मागे राहू नये, यासाठी भरपूर प्रयत्न केले जात आहे. यातील पहिला टप्पा दिव्यांगांना ईव्हीएम, व्हीव्हीपॅट प्रशिक्षणाचा असणार आहे. यंदा लोकसभा निवडणुकीत दिव्यांगांची मतदानात टक्केवारी वाढणार आहे.
- सुनील वारे, प्रमुख, दिव्यांग मतदार सेल, अमरावती