महापालिकेची नियमबाह्य पशुपालकांविरुद्ध कारवाई
By Admin | Updated: May 7, 2015 00:01 IST2015-05-07T00:01:10+5:302015-05-07T00:01:10+5:30
विनापरवानगीने पशुपालन अथवा दुग्ध व्यवसाय करताना सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत असेल तर आता ..

महापालिकेची नियमबाह्य पशुपालकांविरुद्ध कारवाई
छायानगरात जमाव : तीन म्हशींसह बछडे ताब्यात
अमरावती : विनापरवानगीने पशुपालन अथवा दुग्ध व्यवसाय करताना सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत असेल तर आता महापालिका नियमबाह्य पशुपालकांविरुद्ध कारवाई होणार आहे. याच श्रृंखलेत बुधवारी येथील छायानगरात नियमबाह्य पशुपालकांविरुद्ध कारवाई करुन तीन म्हशींसह दोन बछडे ताब्यात घेतले आहे. या कारवाई दरम्यान परिसरात प्रचंड जमाव निर्माण झाला असताना पोलिसांना हा जमाव पांगविताना कसरत करावी लागली, हे विशेष.
आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशानुसार पशुशल्य चिकित्सक सचिन बोंद्रे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई सकाळच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात करण्यात आली. स्थानिक छायानगरात शहेजाद खान अहमद खान यांचा पशुपालनाचा व्यवसाय आहे. मात्र त्यांच्याकडे पशुपालन करण्याचा परवाना नसताना त्यांनी म्हशीपालनासाठी भला मोठा गोठा बांधला आहे. त्यांच्या या पशुपालन व्यवसायाचा त्रास शेजारील शेख कासम यांना कायम होता. पशुपालन व दूग्धव्यवसाय करताना परवाना असणे अनिवार्य आहे. परंतु शेख कासम यांनी महापालिका आयुक्तांकडे या नियमबाह्य पशुपालन व्यवसायाची सातत्त्याने तक्रार करुन प्रशासनाचे लक्ष वेधले. या तक्रारीच्या अनुषंगाने नियमबाह्य पशुपालन व्यवसाय करणारे शहेजाद खान यांना पशुशल्य चिकित्सक विभागामार्फत तीन नोटीस बजावल्या. त्यानंतर शहेजाद खान यांनी एकाही नोटीसला उत्तर दिले नाही. त्यामुळे पशुशल्य चिकित्सक सचिन बोंद्रे यांनी अनिधकृत पशुपालन व्यवसाय सुरु असल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. आयुक्त गुडेवार यांच्या आदेशानुसार या पशुपालन व्यवसायाच्या गोठ्याला कुलूप ठोकले. तसेच ही कारवाई करताना तीन म्हशी व तीन बछडे ताब्यात घेतले. अचानक पशुपालन व्यवसायाविरुद्ध कारवाई होत असल्याने परिसरात जमाव एकत्रित आला. नागपुरी गेट पोलीस ठाण्याचे निरिक्षक दत्ता गावडे यांनी जमावाला पांगविण्यासाठी पोलीस खाक्या वापरावा लागला. दरम्यान तीन म्हशी व दोन बछडे हे ताब्यात घेतल्यानंतर येथील गौरक्षणमध्ये त्यांना पाठविण्यात आले. नियमबाह्य पशुपालन करणाऱ्या शहेजाद खान यांच्या विरुद्ध महापालिका अधिनियम ३८३, ३७६ (अ), कलम २२, २३, २४ प्रकरण- १४ यानुसार महाराष्ट्र नागरी क्षेत्रात गुरे पाळणे नियमानुसार स्वच्छता व आरोग्यास घातक व उपद्रवी पशुपालनावर बंदी आणण्याच्या महापालिका अधिनियमानुसार १९७६ च्या कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान पोलीस निरिक्षक गावडे, पशुशल्य चिकित्सक सचिन बोंद्रे, पोलीस जमादार मुऱ्हेकर, देशमुख, सागर गवई यांच्यासह खासगी कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
परवाने जारी करण्याची प्रक्रिया मंदावली
शहरात पशुपालकांना परवाने जारी करण्याबाबत यापूर्वी महापालिका स्थायी समितीत ठराव मंजूर करण्यात आला होता. पशुंच्या वर्गवारीनुसार परवान्याने दर निश्चित करण्यात आले होते. परंतु त्यानंतर ही प्रक्रिया मंदावली. परवाने घेऊनच पशुपालन करावे, याअनुषंगाने पशुपालकांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. नवीन शासन निर्णयानुसार महापालिका हद्दित दूग्ध अथवा पशुपालन व्यवसाय करणाऱ्यांना परवाने घेवूनच हा व्यवसाय करता येणे शक्य आहे. अन्यथा कारवाईच्या सामोरे जावे लागेल, हे वास्तव आहे.
कारवाई निरंतर
सुरु राहील- आयुक्त
नियमबाह्य पशुपालन व्यवसाय करणे आता शक्य नाही. ज्यांच्याकडे पशुपालनाचे परवाने नाहीत, अशांनी परवाने काढून घेणे अनिवार्य आहे. पशुपालन व्यवसायासंदर्भात नागरिकांची तक्रार आल्यास आता थेट फौजदारी केली जाईल, असे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी सांगितले. शहरात ६० ते ७० हजार पशुंची संख्या असल्याची प्रथमदर्शनी माहिती आहे.
शहरात १७० पशुपालनाचे परवाने
जिल्हा दुग्ध व्यवसाय विभागाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या परवान्यांमध्ये शहरात केवळ १७० पशुपालनाचे परवाने देण्यात आल्याची नोंद आहे. मात्र या परवान्याच्या तुलनेत पशुपालकांची संख्या अधिक आहे. यापुर्वी स्थायी समितीत पशुपालनाच्या परवान्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी झाली तर तिजोरीत उत्पन्न वाढेल, यात दुमत नाही.