एका अग्निशमन यंत्रावर अचलपूरची मदार

By Admin | Updated: September 15, 2015 00:13 IST2015-09-15T00:13:48+5:302015-09-15T00:13:48+5:30

बारूदच्या ढिगाऱ्यावर असलेल्या परतवाडा-अचलपूर या जुळ्या नगरीची मदार एकाच अग्निशमन ंअसून त्याही वाहनाला जिल्हाभर सतत मागणी होत आहे.

At Achalpur a firefight machine | एका अग्निशमन यंत्रावर अचलपूरची मदार

एका अग्निशमन यंत्रावर अचलपूरची मदार

अपघात घडल्यास जबाबदार कोण?: दोन कालबाह्य वाहने धावताहेत रस्त्यावर
लोकमत विशेष

नरेंद्र जावरे अचलपूर
बारूदच्या ढिगाऱ्यावर असलेल्या परतवाडा-अचलपूर या जुळ्या नगरीची मदार एकाच अग्निशमन ंअसून त्याही वाहनाला जिल्हाभर सतत मागणी होत आहे. त्यामुळे अतिसंवेदनशील शहर वाऱ्यावर सुटल्याचे धक्कादायक चित्र आहे.
दीड लाखांवर लोकसंख्या असलेल्या अचलपूर-परतवाडा या जुळ्यानगरीत कुठलीही अप्रिय घटना घडल्यास वेळेवर अग्निशमन वाहन उपलब्ध होईल याची शाश्वती नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत शासनाने तत्काळ दुसऱ्या अग्निशमन वाहनाची परवानगी व त्याकरिता आवश्यक मनुष्यबळ भरती प्रक्रियेला मान्यता देण्यासाठी नगरपालिकेने नुकताच झालेला सर्वसाधारण सभेत एक ठराव घेतला.
भंगार वाहने रस्त्यावर
राज्यातील मोजक्याच नगरपालिकांपैकी ‘अ’ वर्ग असलेल्या अचलपूर नगरपालिकेने २८ वर्षांपूर्वी अग्निशमन वाहनाची खरेदी केली होती. एम. जी. एस. १०८२ क्रमांकाचे वाहन आता कालबाह्य झाले आहे. ते प्रमुख उद्देश असलेल्या आग विझविण्याच्या कुठल्याच कामासाठी वापरण्यास योग्य नसल्याचा शेरा तपासणी अधिकाऱ्यांनी दिला आहे. तर एमएच २७-४९६० हे दुसरे वाहन १८ वर्षांपूर्वी नगरपालिकेत दाखल झाले. तेसुद्धा कालबाह्य असल्याचा शेरा नगरपरिषदेच्या दप्तरी तपासणी अधिकाऱ्यांनी दिल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले. असे असताना ही दोन्ही कालबाह्य झालेली भंगार वाहने जुळ्या नगरीच्या गल्लीबोळातून विनाकर्मचाऱ्यांची धावत आहे. आवश्यक कर्मचाऱ्यांची मंजुरात नसल्याने कालबाह्य अर्थात् निकामी ठरलेली अग्निशमन वाहने संकटाचा कसा सामना करतील, पालिका प्रशासनाने हा देखावा बंद करण्याची नियमानुसार गरज आहे.
एक वाहन जिल्हाभर मागणी
अचलपूर नगरपालिकेत एमएच २७ ए. ५१११ क्रमांकाचे नवीन अग्निशमन वाहन २०१२ मध्ये राज्य शासनातर्फे दाखल झाले. त्यामुळे जुळ्या शहरातील सुरक्षिततेची जबाबदारी या नवीन वाहनावर आल्याने जुळ्या शहरवासीयांना त्यावेळीच आपत्कालीन घटनेचा निपटारा करण्यासाठी अच्छे दिन आल्याचा आनंद झाला. मात्र तो दीर्घकाळ टिकू शकला नाही. या नवीन वाहनाची मागणी संकटकाळी मोर्शी, अंजनगाव, दर्यापूर, धारणी, चिखलदरा, चांदूरबाजार आदी तालुक्यामध्ये होऊ लागली आहे. परिणामी जुळ्या शहरात अशावेळी काही अप्रिय घटना घडल्यास कुठलीच व्यवस्था नसल्याने त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
परतवाडा-अचलपुरात भांडण
सद्यस्थितीमध्ये अग्निशमनाचे एकच वाहन असल्याने ते वाहन परतवाडा शहरातील अचलपूर नगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात ठेवायची की अचलपूर शहरातील लहान नगरपालिका कार्यालयात यावर सभागृहामध्ये दोन्ही शहराच्या नगरसेवकांमध्ये बऱ्याचदा खडाजंगी झाली आहे. सदर वाहन हे अचलपूर शहराच्या नावाने राज्य शासनाने पाठविण्याचे काही नगरसेवकांचे म्हणणे आहे. मुख्यालय परतवाडा असल्याचे काहींचे म्हणणे आहे. त्यामुळे काही दिवस अचलपूर शहरातील हे अग्निशमन वाहन आता परतवाड्यातील मुख्य कार्यालयात उभे आहे.
नवीन इमारत शोभेची वास्तू
परतवाडा शहरातील नगरपालिका मुख्यालयात अग्निशमन वाहनासाठी स्वतंत्र अशी व्यवस्था आहे. त्याचप्रमाणे अचलपूर शहरात अग्निशमन वाहनासाठी लाखो रूपये खर्चून स्वतंत्र अशी इमारत शासकीय निधीतून उभारण्यात आली आहे. विना वाहनाची ही इमारत शोभेची वास्तू ठरली आहे. या इमारतीमध्ये अचलपूर शहरासाठी अत्यावश्यक असलेले अग्निशमन वाहन देण्याची गरज आहे. बारुदच्या ढिगाऱ्यावरील या शहरात केव्हाही कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा इतिहास आहे. तेव्हा प्रशासनाने वेळेपूर्वीच त्याची दखल घेण्याची गरज आहे.
अपुरा अप्रशिक्षित कर्मचारी वर्ग
अचलपूर नगरपालिकेच्या अग्निशमन विभागात प्रत्यक्षात तीन वाहन असल्याचे सांगण्यात येते. त्यापैकी दोन वाहन पूर्णत: कालबाह्य झाली आहे. अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरासह आसपासच्या तालुक्यात घटना घडल्यास येथील वाहन तत्काळ पाठविण्यात येते. मात्र त्या वाहनावर सुद्धा अपुरा अप्रशिक्षित कर्मचारी वर्ग कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती आहे. ‘एक ना घड भाराभर चिंध्या’ असा काहीसा जीवघेणा प्रकार जुळ्या नगरीत सुरू आहे. पालिकेत आकृतीबंध आराखड्यानुसार १४ कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यामध्ये १२ कर्मचारी कार्यरत असून ५ फायरमन प्रशिक्षित असणे गरजेचे असताना उद्धव पुरी, किशोर सहारे व प्रताप भिसे हे तिघेच प्रशिक्षित आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांपैकी एकाला अपंगत्व आले आहे. दोन चालक असून मदतनिस व टेलीफोन आॅपरेटर असे आहेत. प्रत्यक्षात घटनास्थळी जाण्यासाठी बोटावर मोजकेच कर्मचारी पालिकेजवळ असल्याचे सत्य आहे.
नवीन ठरावात केली मागणी
जुळ्या शहरात पाच किमीचे अंतर असून शहराचा आराखडा पाहता गल्लीबोळातील रस्त्यामुळे आगीपासून जिवीत व वित्तीय हानीची शक्यता आहे. त्यामुळे शहराला या घटनेपासून वाचविण्यासाठी अचलपूर शहर विभागाला स्वतंत्र अग्निशमन सेवा देण्याची मागणी करणारा ठराव पालिकेने ४ सप्टेंबरच्या सभेत घेतला आहे. त्या वाहनावर कर्मचारी पदभरतीसाठी मंजुरात देण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. त्यामध्ये वाहन चालक आॅपरेटर ४ जागा, फायरमन चार, हेल्पर ४, दूरध्वनी सहा. दोन अशी मागणी केली आहे.

Web Title: At Achalpur a firefight machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.