कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचा अचलपूर नगरपालिकेकडून धोशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:14 IST2021-09-22T04:14:16+5:302021-09-22T04:14:16+5:30
कचरा संकलित करणाऱ्या वाहनांद्वारे उद्घोषणा, नागरिकांमध्ये संभ्रम परतवाडा : जिल्हा कोरोनामुक्तीच्या मार्गावर असल्याचा अचलपूर नगरपालिकेला विसर पडला आहे. जिल्ह्यात ...

कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचा अचलपूर नगरपालिकेकडून धोशा
कचरा संकलित करणाऱ्या वाहनांद्वारे उद्घोषणा, नागरिकांमध्ये संभ्रम
परतवाडा : जिल्हा कोरोनामुक्तीच्या मार्गावर असल्याचा अचलपूर नगरपालिकेला विसर पडला आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या शून्य येत आहे. तरीही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचा धोशा अचलपूर नगरपालिका लावत आहे.
अचलपूर नगरपालिका क्षेत्रात घरोघरी जाऊन वाहनांद्वारे कचरा संकलन होत आहेत. नगरपालिका क्षेत्रात दररोज फिरणाऱ्या या गाड्यांवर ध्वनिक्षेपक बसविण्यात आले आहेत. या ध्वनिक्षेपकावर ‘स्वच्छ भारत - सुंदर भारत’ची ध्वनिमुद्रिका वाजविली जात आहे. याच सुमारास ध्वनिक्षेपकावरून शहरातील नागरिकांना एक आवाहन होत आहे. त्यानुसार, शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सोशल डिस्टंसिंग पाळा, मास्कचा वापर करा, हात धुवा असे नागरिकांना सूचित केले जात आहे. यावर नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कधी एक, तर कधी दोन, बरेचदा शून्यही निघत असल्याची आकडेवारी शल्यचिकित्सकांकडून जाहीर केली जात आहे. ज्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या शून्य, त्या दिवशी जिल्हा कोरोनामुक्त झाल्याचा आनंदही व्यक्त केला जातो. असे असतानाही अचलपूर नगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे अचलपूर नगरपालिकेकडून दररोज जाहीर केले जात आहे. प्रत्यक्षात कोरोना रुग्णांअभावी कुटीर रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड रुग्णालय ओस पडले आहे. अचलपूर नगर परिषदेच्या विद्यालयातील कोरोना टेस्टिंग सेंटरही मागील एक महिन्यापासून बंद करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर कोरोना रुग्ण निघत नसल्यामुळे काही कर्मचारी वर्गही कमी करण्यात आला आहे. पण, या बदलत्या परिस्थितीचा विसर पडल्यामुळे की काय, अचलपूर नगर परिषदेकडून शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचा उद्घोष आजही कचरा गाड्यांवरून केला जात आहे.