अल्पवयीन शाळकरी मुलीची छेड; अडवून म्हणाला, "चिल्लायेंगी तो ॲसिड डालके मार डालूंगा"
By प्रदीप भाकरे | Updated: February 3, 2023 19:59 IST2023-02-03T19:59:03+5:302023-02-03T19:59:37+5:30
तू माझ्यासोबत बोलत का नाहीस असे म्हणत आरोपीने अल्पयीन मुलीला ॲसिड टाकून मारण्याची धमकी दिली.

अल्पवयीन शाळकरी मुलीची छेड; अडवून म्हणाला, "चिल्लायेंगी तो ॲसिड डालके मार डालूंगा"
अमरावती : तू माझ्यासोबत बोलत का नाहीस, असे म्हणत एका सडकसख्याहरीने भररस्त्यात एका अल्पवयीन शाळकरी मुलीची छेड काढली. ती ओरडताच ‘चिल्लायेंगी, तो ॲसिड डालके मार डालूंगा, म्हणत तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांडली रोडवर २ फेब्रुवारी रोजी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी शेख मोबिन उर्फ आरिफ (२०, हबीबनगर, परतवाडा) याच्याविरूध्द गंभीर गुन्हे दाखल केले. आरोपीला तातडीने अटक करण्यात आली.
१५ वर्षीय विद्यार्थीनी ही गुरूवारी सकाळी १०.३० च्या सुमारास शाळेत जात असताना आरोपीने तिचा पाठलाग केला. तर दुपारी दोनच्या सुमारास शाळेतून घरी येत असताना देखील आरोपीने तिचा पाठलाग केला. तिला कांडली रोडवर गाठत त्याने अचानक तिची छेड काढली. त्यामुळे ती प्रचंड घाबरली. जीवाच्या आकांताने ओरडली. त्यामुळे अनेकांचे लक्ष छेडखानीच्या त्या घटनेकडे वळले. ती ओरडताच त्याने तिला ॲसिड टाकून मारण्याची गर्भित धमकी दिली.
आरोपी तातडीने जेरबंद
तेथून कशीबशी सुटका करत ती घरी पोहोचली. पालकांकडे आपबिती कथन केली. तर, शुक्रवारला पालकांसमवेत जाऊन तिने परतवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. शुक्रवारी दुपारी ३.३० च्या सुमारास आरोपीविरूध्द विनयभंग, पोक्सो व ॲट्रासिटीअन्वये गुन्हा दाखल करताच त्याला अटक करण्यत आली. पुढील तपास ठाणेदार संदीप चव्हान करीत आहेत.