पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी पळाला
By Admin | Updated: May 27, 2016 00:06 IST2016-05-27T00:06:13+5:302016-05-27T00:06:13+5:30
न्यायालयाने पोलीस कोेठडी सुनावलेल्या आरोपीला पुन्हा पोलीस ठाण्यात नेत असताना पोलिसाच्या हाताला झटका मारून आरोपीने पळ काढला.

पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी पळाला
खळबळ : कोर्टातून नेले जात होते ठाण्यात
बडनेरा : न्यायालयाने पोलीस कोेठडी सुनावलेल्या आरोपीला पुन्हा पोलीस ठाण्यात नेत असताना पोलिसाच्या हाताला झटका मारून आरोपीने पळ काढला. ही घटना २५ मे रोजी बडनेरा बसस्थानकावर घडली. सोपान शिवदास रंगे (३५, रा.सिध्दनाथपूर) असे आरोपीचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सिध्दनाथपूर येथील सोपान शिवदास रंगे याला २४ मे रोजी जनावरे चोरीच्या आरोपाखाली कलम ३७९ नुसार गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली होती. २५ मे रोजी सकाळी त्याला पोलिसांनी नांदगाव खंडेश्वर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोेलीस कोठडी सुनावली होती. सायंकाळी६.३० सुमारास आरोेपीला पुन्हा लोणी पोलीस ठाण्यात बसने आणताना पोलीस व आरोपी बडनेरा बसस्थानकावर पोहोचले. तेथे बसमधून उतरत असताना आरोपीने हेड काँस्टेबल प्रमोद बाळापुरे याच्या हाताला झटका देऊन पलायन केले. घटनेची तक्रार बडनेरा पोलीस ठाण्यात २५ मे रोजी रात्री १२ वाजता तक्रार करण्यात आली. बडनेरा पोलिसांनी कायदेशिर रखवालीतून आरोपी पळाल्याच्या कलम २२४ नुसार गुन्हा नोंदविला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र, अद्याप पोलिसांना आरोपी गवसलेला नाही.