चांदूर बाजार : तालुक्यातील शिरजगाव कसबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना वाळूचा उपसा व विक्री होत असल्याच्या माहितीच्या आधारे शिरजगाव कसबा पोलिसांनी नाकाबंदी करून कोंडवर्धा-कुऱ्हा रस्त्यावर वाळू तस्कराला अटक केली.
पोलिसांच्या सापळ्यात वाळू तस्कर अलगद अडकला. यावेळी तपासणीदरम्यान वाळू उत्खननाबाबत कोणत्याही परवाना आरोपीकडे आढळून आला नाही. त्यामुळे याप्रकरणी पंचांसमक्ष अवैध वाळू तस्करांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. १० मार्चला सकाळी ९ ते ९.३० वाळू तस्कर विनापरवाना रेतीचे उत्खनन करीत असल्याची माहिती शिरजगाव कसबा पोलिसांना मिळाली.
दरम्यान, पोलिसांनी कोंडवर्धा-कुऱ्हा रस्त्यावर सापळा रचून वाळू तस्कराला अटक केली. या कारवाईत वाळू तस्कराकडून ४ लाख ७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव जुनेद अहमद अब्दुल अनिस (रा. थुगाव) असून, आरोपीवर भादंविचे कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये एक ब्रास वाळू किंमत अंदाजे सहा हजार रुपये, चार लाखांचा एम.एच. २७ एल ९३९६ क्रमांकाचा ट्रॅक्टर तसेच एक हजारांचा मोबाईल याचा समावेश आहे. सदर कारवाई शिरजगाव कसबाचे ठाणेदार पंकज दाभाडे, पोलीस उपनिरीक्षक मनोज सुरवाडे, कॉन्स्टेबल अंकुश अरबट यांनी केली. तालुक्यातील कोणत्याही वाळूघाटाचा अद्यापही हर्रास झाला नाही.