लेखापालाची कोरोनाशी झुंज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:13 IST2021-05-19T04:13:33+5:302021-05-19T04:13:33+5:30
परतवाडा:-- मेळघाट प्रादेशिक वन विभाग परतवाडा अंतर्गत विभागीय कार्यालयात कार्यरत लेखापाल मागील पंधरा दिवसांपासून कोरोनाशी झुंज देत आहे. तर ...

लेखापालाची कोरोनाशी झुंज
परतवाडा:-- मेळघाट प्रादेशिक वन विभाग परतवाडा अंतर्गत विभागीय कार्यालयात कार्यरत लेखापाल मागील पंधरा दिवसांपासून कोरोनाशी झुंज देत आहे. तर त्यांच्या मदतीकरिता उपवनसंरक्षक, सहायक वनसंरक्षक, वन परिक्षेत्राधिकारी, वनपाल, वनरक्षक, आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांसह सर्वच वन कर्मचारी एकवटले आहेत.
मेळघाट प्रादेशिक वन विभागाच्या विभागीय कार्यालयातील लेखापाल देवीदास खोटे (४७) रा. परतवाडा हे मागील पंधरा दिवसांपासून कोरोनावर उपचार घेत आहेत. मृत्यूशी झुंज देत आहेत.
उपचारादरम्यान अमरावती येथे त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्यामुळे त्यांना तीन दिवसांपूर्वी प्लाझ्माची गरज भासली. प्लाझ्मा मिळावा म्हणून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसह कार्यरत कर्मचाऱ्यांनी हात जोडून प्लाझ्मादात्यांना सोशल मीडियावरून मदत मागितली. यात दाता मिळाला. खोटे यांना तो दिल्या गेला. दरम्यान, त्यांची प्रकृती खालावली. उपचारकर्त्या डॉक्टरांनी त्यांना नागपूरला हलविण्याचा सल्ला दिला.
नागपूरचे उपचार महागडे असल्यामुळे आणि पैसा उपलब्ध नसल्यामुळे हा खर्च कसा करायचा, या विवंचनेत खोटे यांचे कुटुंबीय असतानाच परत कर्मचारी आणि अधिकारी मदतीला पुढे आलेत. सोशल मीडियावरून आर्थिक मदतीचे आवाहन केले गेले.
दरम्यान, ही बाब मेळघाट प्रादेशिक वन विभागाच्या उप-वनसंरक्षक गिंनी सिंह यांच्या लक्षात आली. त्यांनी लागलीच खोटे यांच्या कुटुंबीयांशी भ्रमणध्वनिवरून संवाद साधला. धीर दिला. तत्काळ स्वतः पुढाकार घेऊन भरीव असा आर्थिक मदतीचा हात पुढे केला. अमरावतीपासून नागपूरपर्यंत मदतीचे आणि गरज भासल्यास हक्काने सहकार्य मागण्याचे नियोजनही त्यांनी केले.
आपल्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांकरिता पुढाकार घेऊन मदत करणाऱ्या त्या पहिल्या उप-वनसंरक्षक ठरल्यात. त्यांनी स्वतः केलेली ही आर्थिक, भावनिक मदत मानवतेच्या दृष्टिकोनातून शब्दांपलिकडची ठरली आहे. कार्यरत वन अधिकाऱ्यांसह वन कर्मचारी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या मनालाही ती भावली. नि:स्वार्थ भावनेतून उपवनसंरक्षकांकडून घेतल्या गेलेला पुढाकार आणि केल्या गेलेली ही मदत इतरांना प्रेरणादायी ठरली. यात प्रादेशिक वादाच्या भिंती ओलांडल्या गेल्यात आणि चौफेर मदतीचा ओघ सुरू झाला. अगदी वन्यजीव विभागाकडूनही आर्थिक मदत केल्या गेली.
अवघ्या २४ तासात शंभराहून अधिक वन अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून लाखो रुपये मदतीपोटी खोटे यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधिन करण्यात आली आहेत. यात पाचशे रुपयांपासून तर साठ हजारापर्यंतची आर्थिक मदत समाविष्ट आहे. काही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनीही यथाशक्ति आपले आर्थिक योगदान यात नोंदविले आहे. पैशाअभावी आपल्या सहकाऱ्यांवरील औषधोपचार थांबू नयेत. आपला सहकारी कोरोनावर मात करून आपल्यात परतावा या भावनेतून या आर्थिक मदतीसह परमेश्वराकडेही ते प्रार्थना करीत आहेत. दरम्यान, खोटे यांच्यावर नागपूर येथे औषधोपचार सुरू आहेत.
खोटे हे मूळचे मेळघाटातील पांढरा खडकलगतच्या खैरकुंड येथील रहिवासी आहेत. त्यांनी वनमजूर म्हणून चिखलदरा येथे वन विभागांतर्गत काम करण्यास सुरुवात केली. त्यांचे कामकाज तत्कालीन उपवनसंरक्षक चव्हाण यांना भावले. त्यांनी त्यांना लिपिक म्हणून नियुक्ती दिली. आज ते पदोन्नतीने लेखापाल म्हणून कार्यरत आहेत.
दरम्यान, ते कोरोना संक्रमित निघालेत आणि कोरोनाशी ते झुंज देत आहेत.
(फोटो:-खोटे यांचा)