शिवभोजन थाळीने दिली कोरोनाकाळात साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:13 IST2021-09-19T04:13:39+5:302021-09-19T04:13:39+5:30
अमरावती : कोरोना संसर्गामुळे निर्बंध लागू असल्याच्या काळात गरजूंना शिवभोजन थाळीचा मोठा आधार मिळाला. राज्य सरकारने एप्रिलपासून शिवभोजन थाळी ...

शिवभोजन थाळीने दिली कोरोनाकाळात साथ
अमरावती : कोरोना संसर्गामुळे निर्बंध लागू असल्याच्या काळात गरजूंना शिवभोजन थाळीचा मोठा आधार मिळाला. राज्य सरकारने एप्रिलपासून शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात २७ शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून जानेवारी ते जुलै अखेरपर्यंत सहा लाख १७ हजार १७८ थाळींचे वाटप करण्यात आले आहे.
गरजूंना अल्पदरात भोजन देण्याच्या उद्देशाने महाविकास आघाडी सरकारने गेल्यावर्षी प्रजासत्ताक दिनापासून शिवभोजन योजना सुरू केली. कोरोनाकाळापासून ही थाळी मोफत देण्यात येत आहे. मोफत थाळीची मंगळवारपर्यंत म्हणजे १४ सप्टेंबर बंद मुदत होती. मात्र, आणखी काही दिवस ही थाळी मोफत देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून अल्पदरात भोजन देण्यात येत आहे. सुरुवातीच्या काळात शहरासह ग्रामीण भागात मिळून २४ केंद्रांवर थाळी उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानंतर चांगला प्रतिसाद मिळाला. अशातच आता तीन नवे केंद्र सुरू करण्यात आले आहेत. शहरात आठ, तर ग्रामीण मध्ये १९ केंद्र कार्यरत आहेत. कोरोना संसर्गामुळे हातावर पोट असलेल्यांची रोजी-रोटी थांबली होती. याशिवाय निर्बंध लागू केल्यानंतर निराधार नागरिकांचा जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता. स्वयंसेवी संस्था, नागरिकांनी गरजूंना मदत केली. काहींना शिवभोजन थाळीमुळे या कालावधीत अन्नाची गरज भागविता आली. ग्रामीण भागांत केंद्राची संख्या अधिक आहे. जानेवारी ते जुलै २०२१ पर्यंत अशा सात महिन्यांच्या कालावधी सहा लाख १७ हजार १७८ थाळींचे मोफत वाटप करण्यात आले.
बॉक्स
थाळीची तपासणी पद्धत
परिमंडळ अधिकारी किंवा पुरवठा निरीक्षक यांच्याकडून दर १५ दिवसांनी थाळीवाटप प्रमाणपत्र घेतले जाते. त्यामध्ये केंद्रचालकांनी एकूण वाटप केलेल्या थाळींमधून दुबार थाळ्या वजा करून शिल्लक थाळींचे अनुदान वाटप केले जाते.
बॉक्स
जेवणात काय मिळते
दोन चपात्या प्रत्येकी ३० ग्रॅम
एक वाटी भाजी १०० ग्रॅम
एक वाटी वरण १०० ग्रॅम
एक वाटी भात १५० ग्रॅम
एवढे जेवण एका थाळीमध्ये मिळते.
कोट
शिवभोजन थाळीचा लाभ प्राधान्याने मजूर, गरजू, रुग्णांचे नातेवाईक, निराधार नागरिकांना चांगल्या पद्धतीने झाला आहे. केंद्राच्या तपासणी आणि कामकाजात पारदर्शकता आणून नागरिकांना चांगल्या दर्जाचे अन्न उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहिला.
- डी. के. वानखेडे,
जिल्हा पुरवठा अधिकारी