क्षयरोग प्रतिबंधासाठी तपासणीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:34 IST2020-12-04T04:34:21+5:302020-12-04T04:34:21+5:30
अमरावती : कोरोनाकाळात निदानापासून वंचित राहिलेल्या क्षय रुग्ण व कुष्ठरुग्णांचा शोध घेण्यासाठी घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहे. ...

क्षयरोग प्रतिबंधासाठी तपासणीला वेग
अमरावती : कोरोनाकाळात निदानापासून वंचित राहिलेल्या क्षय रुग्ण व कुष्ठरुग्णांचा शोध घेण्यासाठी घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहे. याकरिता जिल्हा व महापालिका क्षेत्रात संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोध अभियान राबविण्यात येत आहे. सदर अभियानासाठी १,५५० पथकांची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यातील ४ लाख ५२ हजार ४२ कुटुंबाचे सर्वेक्षण व २२ लाखांवर नागरिकांनी तपासणी करून कुष्ठरोग व क्षयरोगाला आळा घालण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध व कुष्ठरुग्ण शोध अभियानांतर्गत सर्वेक्षणाला प्रारंभ झाला आहे. शास्त्रीय अभ्यासानुसार क्षय आणि कुष्ठरुग्ण निदान व औषधोपचारापासून वंचित राहिल्यास आरोग्यविषयक अनेक गुंतागुंतीचा सामना करावा लागतो. त्यासोबतच त्यांच्या सहवासातील इतर निरोगी लोकांनाही संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा रुग्णांचा शोध आणि त्यांच्यावर उपचार करण्याकरिता १ डिसेंबरपासून घरोघरी आरोग्य तपासणी केली जात आहे. या मोहिमेसाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी महापालिका क्षेत्रात आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समिती, तर गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत तालुका समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. पुढील मोहिमेच्या धर्तीवर ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तपासणीकरिता घरी येणाऱ्या आशा सेविका, तसेच स्वंयमसेवकांना सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
बॉक्स
औषधोपचार मोफत
सर्वेक्षण पथकात आशा स्वयंसेविका आरोग्यसेवक यांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील सर्व घरांची, तर शहरी भागातील निवडक भागाचे सर्वेक्षण केले जाणार आहे. रोगनिदान झाल्यास संपूर्ण औषधोपचार मोफत करण्यात येणार आहे. संशयित रुग्णांना संदर्भ पत्रिका देण्यात येणार आहे. ही पत्रिका मोफत उपचाराकरिता उपयुक्त ठरणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी दिली.
बॉक्स
जिल्ह्याची सद्यस्थिती
क्षय रुग्ण १६३७
कुष्ठरोगी २४०
बॉक्स
ग्रामीण क्षेत्र (झेडपी क्षेत्र) १२९१
शहरी न.प. क्षेत्र ११५
महापालिका क्षेत्र १४४