बालगृहात मारहाण, तरीही अभय !
By Admin | Updated: December 23, 2014 22:55 IST2014-12-23T22:55:00+5:302014-12-23T22:55:00+5:30
'केअर अॅन्ड प्रोटेक्शन अॅक्ट' अंतर्गत बालगृहात असलेल्या कुठल्याही मुलीला बाहेरील व्यक्तीने भेटणेही गुन्हा ठरतो. ललित अग्निहोत्री नावाच्या त्रयस्थ तरुणाने वसतीगृहात जाऊन अंबाला मारहाण

बालगृहात मारहाण, तरीही अभय !
आदेशाला खो : 'केअर अॅन्ड प्रोटेक्शन अॅक्ट'चे काय ? प्रशासकाची काय होती मजबुरी ?
गणेश देशमुख - अमरावती
'केअर अॅन्ड प्रोटेक्शन अॅक्ट' अंतर्गत बालगृहात असलेल्या कुठल्याही मुलीला बाहेरील व्यक्तीने भेटणेही गुन्हा ठरतो. ललित अग्निहोत्री नावाच्या त्रयस्थ तरुणाने वसतीगृहात जाऊन अंबाला मारहाण केल्याचा अधिकृत अहवाल उपलब्ध आहे. त्यासाठी त्याची तक्रार करण्याचे आदेशित करण्यात आले होते. तत्कालिन अधीक्षक गजाननन चुटे यांनी तरीही ललितची पोलीस तक्रार का केली नाही, असा गुढ प्रश्न आता निर्माण झाला आहे.
अंबा ही विदर्भ महारोगी सेवा मंडळाच्या कनिष्ठ वरिष्ठ बालगृहात वास्तव्याला असताना ललित नावाच्या तरुणाचा तिथे मुक्त संचार होता. ललितच्या या मुक्त संचारावर अंबाच्या मातापित्यांनी अक्षेपही नोंदविला होता. वसतीगृहातील एका 'डेअर्ड' मुलानेही या वावराबाबत विरोध दर्शविला होता. पुढे त्या मुलाचेच इतरत्र स्थानांतरण झाले.
स्वत:च्याच अहवालाने चुटे अडचणीत
ललित अग्निहोत्री हा वसतीगृहात अंबाला वारंवार भेटायचा. तिला बाहेर फिरायला घेऊन जायचा, मारहाण करायचा याचे काही पुरावे 'लोकमत'च्या हाती लागले आहेतच. तथापि, या मारहाणीला बळकटी देणारा स्वत: गजानन चुटे याच्या स्वाक्षरीचा सर्वाधिक महत्त्वाचा पुरावादेखील 'लोकमत'च्या हाती लागला आहे.
''ललित अग्निहोत्री नावाचा तरुण वसतीगृहात जाऊन तिला (अंबा) मारझोड करतो. त्याच्या भितीने ती कॉलेजलादेखील जात नाही, असे आढळून आले आहे.'' असा स्पष्ट उल्लेख खुद्द चुटे याने त्या पत्रात केलेला आहे. नागपूरच्या बाल कल्याण समितीच्या अध्यक्षांना १३ आॅक्टोबर २०१४ रोजी त्याने हे विनंती पत्र पाठविले होते. ४७५/२०१४-१५ असा त्या पत्राचा जावक क्रमांक आहे.
अध्यक्षांचे लेखी आदेश
एकूण पाच मुद्दे असलेल्या त्या पत्रात चौथ्या क्रमांकावर ललितसंबंधिच्या मुद्याचा समावेष आहे. नागपूर येथे पाटणकर चौकात कार्यालय असलेल्या बाल समितीच्या अध्यक्षांनी एकूण पाच मुद्यांपैकी ललित मारहाण करीत असल्याच्या मुद्याची विशेष दखल घेतली. 'तपोवन बालगृहाच्या अधीक्षकांनी ललित अग्निहोत्रीविरुद्ध पोलीस तक्रार करावी', असे आदेश त्या पत्रावर लेखी स्वरुपात नोंदविण्यात आले आहेत. २८ आॅक्टोबर २०१४ रोजी हा आदेश लिहून सदर पत्र चुटे याला उलटटपाली रवाना करण्यात आले होते. त्यानंतर आजतागायत चुटे याने ललित अग्निहोत्री या तरुणाची पोलीसात तक्रार केलेली नाही. बाल समितीच्या आदेशालाच नव्हे तर 'केअर अॅन्ड प्रेटेक्शन अॅक्ट'लाही चुटे याने केराची टोपली दाखविली.
ही तर अजय लहानेंची मूक संमतीच!
तपोवन येथील बालगृहाचे प्रशासक असलेले प्रशासकीय अधिकारी अजय लहाने यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. कुणी त्रयस्थ व्यक्ती वसतीगृहात जाऊन मारहाण करूच नये, याची दक्षता घेणे लहाने यांचे कर्तव्यच होते. त्यांनी त्यांचे कर्तव्य बजावल्याच्या पाऊलखुणा दिसत नाहीत. तपोवनात अनाथ मुलींची आयुष्ये तेथील कारभाऱ्यांकरवीच उद्धवस्त केली जात असताना अजय लहाने मुख्य कारभारी होते. बाल कल्याण समितीच्या अध्यक्षाने पोलीस तक्रारीचे आदेश दिले असताना लहाने यांनी त्यानुसार कारवाई का करवून घेतली नाही? लहाने गप्प का होते? अधीक्षक चुटे याच्या किळसवाण्या कारभाराला ते अभय का देत होते? उमलत्या कळ्या कुसकरल्या जात असतानाही चुप्पी साधावी लागण्याइतपत लहाने यांची काय मजबुरी होती? आरोपींना पाठीशी घालण्यामागे त्यांचा काय उद्देश होता? असे नाना प्रश्न आता उपस्थित होत आहेत. तपोवनात घडलेल्या नियमबाह्य कारभाराला प्रशासक या नात्याने लहाने हे जबाबदार ठरतातच. केवळ अधीक्षक आणि सचिव यांच्यावर कारवाई करून थांबणे योग्य होणार नाही. लहाने यांनाही यासंबंधाने जाब विचारायलाच हवा. त्यांचीही चौकशी व्हायलाच हवी.