तरुणीचे अपहरण, अज्ञातस्थळी डांबले.. बलात्कारातून गर्भधारणा!
By प्रदीप भाकरे | Updated: January 12, 2023 13:18 IST2023-01-12T13:17:04+5:302023-01-12T13:18:05+5:30
चार महिन्यांची गर्भवती: परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना, आरोपी अज्ञात

तरुणीचे अपहरण, अज्ञातस्थळी डांबले.. बलात्कारातून गर्भधारणा!
अमरावती : एका २२ वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिला दोन ते अडीच महिने अज्ञात स्थळी डांबण्यात आले. तेथे तिच्यावर वारंवार अतिप्रसंग करण्यात आला. त्यातून ती चार महिन्यांची गर्भवती राहिल्याची घटना परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात उघड झाली. १२ सप्टेबर २०२२ रोजी अपहरणाची ती घटना घडल्याचे पिडिताने सांगितले.
अचलपूर तालुक्यातील एका २२ वर्षीय तरूणीच्या तक्रारीनुसार, १२ सप्टेंबर २०२२ रोजी रात्री ११.४५ च्या सुमारास अज्ञात व्यक्तीने, अज्ञात वाहनाने शरीरसंबंध ठेवण्याच्या उद्देशाने तिचे अपहरण केले. सुमारे दोन ते अडीच महिने अज्ञात स्थळी एका खोलीत डांबून वारंवार शरीरसंबंध ठेवले. त्यामुळे तिला गर्भधारणा झाली. त्या अज्ञाताच्या तावडीतून स्वत:ची सुटका करत त्या तरुणीने कसेबसे गाव गाठले.
दरम्यान काही दिवसांपुर्वी ती अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पोहोचली. तेथून तिला जिल्हा स्त्री रुग्णालयात हलविण्यात आले. तिची तपासणी केली असता, ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे लक्षात आले. तेथील वैदयकीय अधिकाऱ्यांनी त्याबाबत तिला विचारणा केली. त्यावेळी बलात्काराच्या घटनेचे बिंग फुटले. अचलपूर व अमरावती शासकीय रूग्णालयात तिचे बयाण घेण्यात आले. दरम्यान तिचे गाव व घटनास्थळ परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने ते बयाण परतवाडा पोलिसांत पाठविण्यात आले. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला.