अचलपुरात अस्वलीची दहशत

By Admin | Updated: May 7, 2014 01:09 IST2014-05-07T01:09:42+5:302014-05-07T01:09:42+5:30

शहापूर शेतशिवारात मंगळवारी पहाटे ६.३० वाजता एका शेतात गर्भवती अस्वलीने बस्तान मांडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे

Aaswali's panic in Achalpur | अचलपुरात अस्वलीची दहशत

अचलपुरात अस्वलीची दहशत

 सुरक्षेची खबरदारी : वन विभागाने लावला पकडण्यासाठी पिंजरा

अचलपूर : शहापूर शेतशिवारात मंगळवारी पहाटे ६.३० वाजता एका शेतात गर्भवती अस्वलीने बस्तान मांडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बारा तासांनंतरही त्या अस्वलीला पकडण्यात वन विभागाला यश आले नव्हते. अचलपूर शहरातील महेराबपुरा शेतशिवारातील प्रदीप पाटील यांच्या केळीच्या शेतात राजू गभणे पहाटे ६.३० वाजता पाणी ओलितासाठी गेले होते. त्यांना अचानक शेतात अस्वल आढळली. अस्वलीने त्यांच्यावर चवताळून हमला करण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये राजू गभणे बचावले. त्यांनी सदर माहिती पाटील यांना दिली. परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकारी हरिश्चंद्र पटगव्हाणकर वनपाल अशोक आठवले, वनरक्षक दिनेश वाठ, थोरात यांनी परतवाड्याच्या मुगलाहेरपुरा येथील सहेद भोपाली यांना घेऊन घटनास्थळ गाठले. तर दुसरीकडे सरमसपुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार क्षीरसागर व सहकारीसुध्दा पोहोचले होते. सकाळी ११.३० वाजतापासून अस्वल पकडण्याचा प्रयत्न सुरु होता.

परंतु अपुरा कर्मचारी बळ व अस्वल पकडण्यासाठी कुठलीच अशी अत्याधुनिक सुविधा नसल्याने सर्व प्रयत्न व्यर्थ ठरत गेले. शेतकर्‍यांना सतर्कतेचा इशारा अचलपूर शहरातील हिरापुरा, नौबागपुरा, पांढरी, वडगाव, रामपुरा, सराईपुरा भागात अस्वलाने उच्छाद मांडला असला तरी दोन महिन्यांपूर्वीच वन विभागाच्यावतीने उन्हाळ्याच्या दिवसांत मुबलक पाणी व केळी, मोह आदी फळे अस्वलीचे आवडते खाद्य असल्यामुळे येण्याची शक्यता वर्तविली होती. तसे जनजागृतीवर अभियान चालवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याचे वन विभागाच्यावतीने सांगण्यात आले. मंगळवारी पोलिसांनी परिसरातील काही गावांना दुपारी २ वाजता अस्वल परिसरात शिरल्याचे भोंग्यातून मुनादीद्वारे संबोधित केले होते. त्यामुळे काही नागरिक सतर्क झाले होते. (प्रतिनिधी)

नागरिकांची परिसरात गर्दी

मेळघाटच्या चिखलदरा परीक्षेत्रातून ही गर्भवती अस्वल शहापूर, पांढरी, वडगाव परिसरात आल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली. अस्वल आल्याची माहिती परिसरात क्षणात वार्‍यासारखी पसरताच नागरिकांनी अस्वल पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. ज्या शेतात अस्वल होती, तेथे चहुबाजूंनी नागरिकांची आरडा-आरेड पाहता अस्वल चवताळून सैरावैरा पळत सुटली होती. अंगावर घेतली झेप

अस्वलचा पाठलाग करण्याच्या नादात हिरापुरा परिसरातील शेख बाबू हा इसम बचावला, शहापूर शेतशिवारातील एका शेतातून अस्वल दुसर्‍या शेतात पळत सुटताच शेख बाबू यांच्या अंगावर गेले. परंतु तेथे काटेरी झुडपात पाय अडकल्याने बाबू बचावला. ‘रेस्क्यू’ नाही

अस्वल गर्भवती असल्याने बंदुकीतून तिला बेशुध्द करण्याचे औषध सोडणे धोक्याचे ठरणार असल्याचे पाहता रेस्क्यू आॅपरेशन केले जाणार नसल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे. जर अस्वलने धुमाकूळ घातला तर त्यानंतर योग्य निर्णय घेतला जाणार आहे. पिंजरा लावला

नागरिकांची गर्दी पाहता अस्वल अब्दुलभाई यांच्या शेतात शिरले. मक्याचे दाट पीक असलेल्या या शेतात अस्वल दुपारी २.२० वाजता शिरले. सायंकाळी वृत्त लिहिस्तोवर बाहेर न आल्याने, वन विभागातर्फे एक लोखंडी पिंजरा तेथे लावण्यात आला. पिंजर्‍यामध्ये मोहफुले टाकण्यात आली. या मोहफुलाच्या वासानेच शहापूर परिसरात हे अस्वल भटकले. अचलपूर परिसरात शिरलेले अस्वल पकडण्याची मोहीम सुरु आहे. घडनास्थळी रेस्क्यू आॅपरेशन पथक सुध्दा आहे.

मोहफुलांच्या सुगंधामुळे अस्वल भटकले. दोन महिन्यांपूर्वीच नागरिकांना सतर्कतेची सूचना दिली होती. -निनू सोमराज उप-वनसंरक्षक, वन विभाग, अमरावती.

Web Title: Aaswali's panic in Achalpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.