अपहृत दीड वर्षाची चिमुकली अखेर सापडली; ७८ तासांपासून होती बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2022 14:59 IST2022-07-12T14:52:15+5:302022-07-12T14:59:44+5:30
झोपडीपासून दीड किमी अंतरावर संत्र्याच्या झाडाखाली मृर्छित अवस्थेत आढळली.

अपहृत दीड वर्षाची चिमुकली अखेर सापडली; ७८ तासांपासून होती बेपत्ता
जरूड-वरूड (अमरावती) : जरूड शिवारातील झोपडीतून गेल्या ७८ तासांपासून बेपत्ता असलेली दीड वर्षाची चिमुकली अखेर दीड किलोमीटर अंतरावर एका शेतात मूर्च्छित अवस्थेत सोमवारी दुपारी आढळली. सुमारे १२ तासांपूर्वी तिला या परिसरात टाकण्यात आल्याचा अंदाज तिच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकांनी व्यक्त केला. तिच्या अपहरणाला अंधश्रद्धेची किनार आहे की कसे, याबाबत पोलीस आता तपास करणार आहेत.
जरूड शिवारात पिंपळखुटा रोडवरील संजय चोपडे यांच्या शेतात वास्तव्यास असलेल्या रमाबत्ती वडिवे हिची मुलगी कीर्ती ८ जुलैच्या सायंकाळी ६ पासून बेपत्ता झाली होती. ही माहिती कळविताच वरूड पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलीस निरीक्षक प्रदीप चौगावकर यांनी अमरावतीवरून एनडीआरएफ टीम बोलावली होती. आजूबाजूच्या शेतातील विहिरींमध्ये जेसीबीने व मोटरपंपाने अतिशय ताकदीने पाणी फवारून पाहणी करण्यात आली.
दरम्यान, ११ जुलै रोजी दुपारी १२ च्या सुमारास एका शेतात संत्र्याच्या झाडाखाली मूर्च्छित अवस्थेत बालिका असल्याचे शेतमजुराला दिसले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिची ओळख पटविली. ग्रामीण रुग्णालयातील अतिदक्षता विभागात डॉ. प्रमोद पोतदार, बालरोगतज्ज्ञ डॉ. परीक्षित रामपुरे, डॉ. प्रशांत शेळके, आरोग्य सेविका वर्षा दरोकर, रमेश शिरभाते यांनी शर्थीचे प्रयत्न करून कीर्तीला शुद्धीवर आणले. कीर्तीची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पाच किमी परिसर काढला पिंजून
अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत सातव व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश पांडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन तातडीने तपास करण्याचे निर्देश होते. त्यानुसार वरूड व अमरावतीच्या ५० ते ६० पोलिसांचे पथक रात्री-अपरात्री शोधमोहीम राबवित होते. पंचक्रोशीत झपाट्याने पसरल्याने ग्रामस्थसुद्धा या शोधमोहिमेत सहभागी झाले. त्यांनी परिसरातील सुमारे पाच किमीचा परिसर पिंजून काढला.
बळी देण्याचा डाव फसला?
नरबळी देण्यासाठी अपहरण करून कीर्तीला दोन दिवस लपवून ठेवण्यात आले असावे. परंतु, प्रकरण अंगलट येईल, या भीतीने रविवारी रात्री भर पावसात संत्रा झाडाखाली ठेवून अज्ञात आरोपीने पळ काढला असावा, अशी शंका पोलीस तसेच नागरिकही व्यक्त करीत आहे.
बालिका बेपत्ता झाल्यापासूनच अपहरणाचा गुन्हा दाखल केला. अंधश्रद्धासाठी तिचे अपहरण करून नरबळी देण्याचा प्रकार तर नाही ना, या दृष्टीनेही आमचा तपास सुरू आहे.
- वैभव महागरे, सहायक पोलीस निरीक्षक, वरूड