साडेतीन वर्षांच्या मुलाच्या छातीत अडकला फुटाणा; डॉक्टरांनी पेलले आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2022 22:10 IST2022-07-07T22:10:03+5:302022-07-07T22:10:28+5:30
Amravati News धारणी तालुक्यातील साडेतीन वर्षीय मुलाच्या छातीत अडकलेला फुटाणा व त्याचे टरफल काढण्यासाठी ब्रोन्कोस्कोपी ही शस्त्रक्रिया करून त्याला वैद्यकीय चमूने जीवनदान दिले.

साडेतीन वर्षांच्या मुलाच्या छातीत अडकला फुटाणा; डॉक्टरांनी पेलले आव्हान
अमरावती : धारणी तालुक्यातील साडेतीन वर्षीय मुलाच्या छातीत अडकलेला फुटाणा व त्याचे टरफल काढण्यासाठी ब्रोन्कोस्कोपी ही शस्त्रक्रिया करून त्याला वैद्यकीय चमूने जीवनदान दिले. अमरावती येथील खासगी रुग्णालयात हे उपचार करण्यात आले.
धारणी येथे उपचार करूनही चिमुकल्याला दम लागत होता. श्वास घेण्यास त्रास होत होता. याशिवाय दम लागत होता. खोकला व तापदेखील होता. त्यामुळे आईवडिलांनी परतवाडा येथे दाखविले, तेव्हा सीटी स्कॅन करण्यात आले. छातीमध्ये काहीतरी अडकल्याचे निदान झाले. त्यामुळे त्याला अमरावती येथे डॉ. सौरभ अंबाडेकर यांच्याकडे दाखविण्यात आले. त्यावेळी अडकलेला पदार्थ हा फुटाणा असल्याची शंका चिमुकल्याच्या आईने व्यक्त केली. यावर डॉ. सौरभ अंबाडेकर यांनी ब्रोन्कोस्कोपी करून फॉरेन बॉडी काढणे हाच एकमेव उपचार असल्याचे सांगितले.
ब्रोन्कोस्कोपी दरम्यान रुग्णाच्या फुप्फुसामध्ये एका ठिकाणी फुटाणा एक महिन्यापासून अडकून फुगलेला असल्याचे तर दुसरीकडे फुटाण्याचे टरफल अडकलेले असल्याचे दिसून आले. ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया डॉ. सौरभ अंबाडेकर व डॉ. स्वप्निल शर्मा यांनी पार पाडली. भूलतज्ज्ञ म्हणून डॉ. शिरीष माहुरे तसेच डॉ. रोहन बोबडे, डॉ. लक्ष्मी भोंड व इतर नर्सिंग स्टाफ उपस्थित होते. शस्त्रक्रियेनंतर डॉ. भूपेश भोंड, डॉ. लक्ष्मी भोंड व डॉ. रोहन बोबडे, डॉ. सूरज राठी, डॉ. सुमीत गावंडे यांच्या निगराणीखाली उपचार करण्यात आले.