९८ टक्के शेतकऱ्यांचा माती परीक्षणाला ‘खो’

By Admin | Updated: February 11, 2015 00:37 IST2015-02-11T00:37:30+5:302015-02-11T00:37:30+5:30

जमिनीचा कस पाहून पिके घेतली तर उत्पादन क्षमता वाढविता येऊ शकते.

98 percent of farmers lose 'soil testing' | ९८ टक्के शेतकऱ्यांचा माती परीक्षणाला ‘खो’

९८ टक्के शेतकऱ्यांचा माती परीक्षणाला ‘खो’

लोकमत विशेष
भंडारा : जमिनीचा कस पाहून पिके घेतली तर उत्पादन क्षमता वाढविता येऊ शकते. मात्र जिल्ह्यातील शेतकरी जमिनीच्या तपासणीत निरूत्साही असल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यातील २ लाख १३,५४८ शेतकऱ्यांपैकी २,६१२ शेतकऱ्यांनी माती व पाणी परीक्षण केले आहे. एकूण शेतकऱ्यांच्या तुलनेत केवळ दोन टक्के शेतकऱ्यांनीच माती परीक्षण केले आहे.
भंडारा जिल्ह्यात ८७५ गावांचा समावेश आहे. सन २०१४-१५ या चालू वर्षासाठी १८० गावांतील ३,३८५ माती परीक्षणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून कृषी विभागाने परीक्षणासाठी पाठविलेल्या २,२०० नमुन्यांचे माती परीक्षण करण्यात आले. माती परीक्षण केल्याने जमिनीतील नत्राचे प्रमाण लक्षात येते. परीक्षणासाठी कृषी विद्यापीठ व भूजल परीक्षण विभागाने ठरवून दिलेल्या प्रमाणात आणि शेतकऱ्यांनी परीक्षणासाठी आणलेल्या मातीमध्ये कमी-जास्त प्रमाण लक्षात कृषी विभागाद्वारा नत्र, स्फूरद, पलाश, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, गंधक आदी घटकांचे प्रमाण ठरवून दिले जाते. त्यामुळे जमिनीचा कस वाढून उत्पादन वाढविता येते. शेतकऱ्यांसाठी हे परीक्षण फायदेशीर ठरते. मात्र शेतकरी पारंपरिक शेती पद्धतीवरच भर देतो. ठिबकचे अनुदान मिळण्यासाठी हे परीक्षण बंधनकारक आहे. किंबहुना अनेक शेतकऱ्यांचे माती परीक्षण ठिबक कंपन्याच करून आणतात व अनुदानासाठी परस्परच परीक्षणाचा अहवाल जोडतात. वास्तविकता माती परीक्षणाशिवाय पारंपरिक पद्धतीने शेती करणे कठीण झाले असून माती परीक्षण गरजेचे झाले आहे.
अशी आहे परिक्षण पद्धती
मातीचे तीन टप्प्यात तर पाण्याच्या नमुन्यांचे एकाच टप्प्यात परीक्षण केले जाते. मातीमध्ये सर्वसाधारण ३५ रुपए, विशेष २७५ रुपए, सुक्ष्म पद्धती २00 रुपए तर पाणी परीक्षणासाठी ५0 रुपए यांनुसार दर आकारणी केली जाते.
माती-पाणी परिक्षण गरजेचे
सिंचनाच्या सुविधा वाढत असल्याने शेतकऱ्यांचा कल वर्षभरात दोन ते तीन पिके घेण्याकडे दिसून येतो. उत्पादन वाढविण्यासाठी जैविक व नैसर्गिक खतांऐवजी रासायनिक खतांचा अधिकाधिक वापर होत आहे. या खतांच्या वापराने व अधिक पिके घेण्याच्या प्रकारामुळे जमिनीची पोत बिघडून ती कडक होते व जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण वाढते. यासाठी मातीचे परीक्षण करून कोणत्या घटकांची कमतरता आहे, हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
असा असावा मातीचा नमुना
माती परीक्षणासाठी शेतात ८ ते १0 ठिकाणी एक फूट लांब, रुंद खड्डा खोदावा. खड्ड्याच्या चारही बाजूची माती एकजीव करून माती परीक्षणासाठी आवश्यक असते. खतांच्या वापराने बिघडतो जमिनीचा पोत बिघडते. यामुळे उत्पादनावर विपरित परिणाम होतो.
मातीमध्ये असतात १६ ते २0 घटक
भंडारा जिल्ह्यातील मातीमध्ये १६ ते २0 घटक आढळून येतात. जिल्ह्यात धानाचे मुख्य पीक आहे. यामुळे येथील शेतीत पालाश मोठ्या प्रमाणात आढळून येते. त्यानंतर नत्र कमी व स्फुरद मध्यम प्रतीत आढळतात. यासोबतच सुक्ष्म खते, मंगल, गंधक, झिंक, लोह, मॅग्नीज, मॅग्नेशिअमसारखे अनेक घटक कमी आढळून आल्याने पीक उत्पादनात घट येते.
दर तीन वर्षांनी माती तपासणी करणे आवश्यक आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन घ्यायचे असेल तर शेतामधील पाणी, मातीत पानांचे परीक्षण महत्वाचे आहे. सोबतच ओलीत क्षेत्राची माती तपासणी नमुना आधारीत खताची मात्रा द्यावी. यामुळे उत्पादन क्षमता वाढेल व खताच्या खर्चात बचत होईल. अधिकाधिक शेतकऱ्यांनी पाणी परीक्षण करावे .
- एम. व्ही. मुऱ्हेकर,
जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी, भंडारा.

Web Title: 98 percent of farmers lose 'soil testing'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.