पोलीस सूत्रांनुसार, चांदूर बाजार तालुक्यातील बेलोरा येथील युवकाने ५ डिसेंबर रोजी औषध बोलावले होते. १२ एप्रिल रोजी ते स्पीड पोस्टने प्राप्त झाले. त्यात एक कुपन होते. त्यावर स्क्रॅच केले असता, गिफ्ट लागल्याचे नमूद होते. त्यामुळे ९४७७०३३०३८ या क्रमांकावर कॉल केला. चारचाकी वाहन बक्षीस मिळत असल्याचे संबंधिताने सांगितले. यानंतर त्याच्या वडिलांच्या मोबाईल क्रमांकावर ६९०१८७५७७६ क्रमांकावरून मनोज पाटीदा नामक व्यक्तीने कॉल केला. वाहन हवे की रक्कम, असे त्याने विचारले. रक्कम असे सांगताच त्याने स्टेट बँकेच्या एका खातेक्रमांकावर कंपनीचा टॅक्स म्हणून ७२०० रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर जीएसटीचे २८ हजार ८०० व पुन्हा ५७ हजार ६०० रुपये ऑनलाईन पेमेंट करण्यात आले. मात्र, त्यानंतर कुठलाही कॉल आला नाही. युवकाने २० एप्रिल रोजी चांदूर बाजार पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादंविचे कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
आमिष दाखवून ९३ हजारांनी फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:14 IST