९ लाख ८८ हजार पशुधनाचे जून महिन्यात लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:13 IST2021-05-19T04:13:31+5:302021-05-19T04:13:31+5:30
कोरोनाकाळात पशुसंवर्धन विभागासमोर आव्हान अमरावती : एकीकडे कोरोना लसीअभावी नागरिकांचे लसीकरण थांबले आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील ९ लाख ८८ ...

९ लाख ८८ हजार पशुधनाचे जून महिन्यात लसीकरण
कोरोनाकाळात पशुसंवर्धन विभागासमोर आव्हान
अमरावती : एकीकडे कोरोना लसीअभावी नागरिकांचे लसीकरण थांबले आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील ९ लाख ८८ हजार ४९९ हजार जनावरांचे लसीकरण रखडले असून, आता जून महिन्यापासून पशुधनाच्या लसीकरणाचा मुहूर्त काढला जाणार आहे. त्यामुळे तोंडखुरी, पायखुरी, घटसर्प, एकटांग्या यांसारख्या आजारापासून जनावरांची मुक्तता होऊ शकणार आहे. विशेष म्हणजे, सहा महिन्यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात जनावरांचे लसीकरण पार पडले होते.
जिल्ह्यात पशुधनाची संख्या मोठी आहे. त्यात गायवर्ग पशुधनाची संख्या ४ लाख ६२ हजार ०२३ असून, त्यानंतर म्हैसवर्ग पशुधनाची संख्या १ लाख २८ हजार ५८६ इतकी आहे. याशिवाय शेळ्या, मेंढ्या व अन्य पशुधनाचीही संख्या बरीच आहे. पावसाळ्यानंतर दरवर्षी जनावरांना विविध आजारांची लागण होत असते. लाडखुरकत या विषाणूजन्य रोगाच्या प्रादुभार्वामुळे जनावरे बाधित होण्याचे प्रमाण ९० ते ९५ टक्के असते. त्यामुळे पशुधनाची नुकसान टाळण्यासाठी सर्व पशुधनाला लसीकरण केले जाते. हे लसीकरण दरवर्षी करण्यात येते. यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली होती.
बॉक्स
कोणत्या लसी दिल्या जातात?
गाई-म्हशींना तोंडखुरी, पायखुरी सोबतच एक टांग्या आणि घटसर्पची लस दिली जाते. शेळ्या-मेंढ्यांना पीपीआर आणि यात ॲटरोटॉसक्सिमिया या रोगासोबत कुक्कटांना लासोटा, राणीखेत, डिसीज फाॅऊल पॉक्स आणि कुत्र्यांना अँटिरेबीज लस दिली जात असल्याचे सांगण्यात आले.
बॉक्स
अशा प्रकारे दिली जाते लसीच्या मात्रा
लसीकरण अंतर्गत दरवर्षी पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत लहान जनावरांना दवाखान्यात व मोठ्या जनावरांना पशुपालकांच्या घरी जाऊन लस देण्यात येते. पीपीआर लस शेळ्यांना दर तीन वर्षांनी, तर इतर सर्व लसीकरण दर सहा महिन्यांच्या कालावधीत करावे लागते. कर्मचाऱ्यांची संख्या तोकडी असतानाही गतवेळचे लसीकरण ९० टक्क्यांपर्यंत पूर्ण करण्यात आले होते.
बॉक्स
लसीकरणासाठी सहकार्य करा
कोट
जून महिन्यात मान्सूनपूर्व लसीकरणाला सुरुवात होणार आहे. सध्या जिल्ह्यात सांसर्गिक रोगाचा प्रादुर्भाव नाही.तोंडखुरी,पायखुरी या विषाणू जन्य रोगाचे लसीकरण मोठ्या जनावरांना प्राधान्याने करण्याचे नियोजन केले आहे. कोरोनाकाळात जिल्ह्यात पशुआरोग्य सेवा नियमित पुरविण्यात येत आहे.
- विजय राहाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, अमरावती
बॉक्स
पशुपालक म्हणतात
दर सहा महिन्यांनंतर आम्ही पशुधनाला लसीकरण करीत असतो. विशेषत: तोंडखुरी, एकटांग्या व घटसर्प आजार जनावरांमध्ये पाहायला मिळतो. मात्र, योग्य वेळी लसीकरण झाले, तर जनावरांना रोगाची लागण होत नाही.
- शंकर मानकर, पशुपालक
कोट
नोव्हेंबर महिन्यात पशुधनावर लसीकरण केले होते. त्यामुळे कुठल्याही आजाराची लक्षणे जनावरांमध्ये आढळून आली नाहीत. आता जून महिन्यात लसीकरण मोहीम राबविली जाते. त्यादरम्यान पशुधनाला लसीकरण करून घेणार आहोत.
- गोविंदा टेकाळे, पशुपालक