अमरावती : एप्रिल महिन्यात कोरोना संसर्गाने कहर केला आहे. यात निरंतरपणे संक्रमित रुग्ण आणि मृत्युसंख्या वाढतच आहे. सोमवारी कोरोनाचे नवे ८६९ रुग्ण आढळून आले असून, १० अमरावती, तर पाच अन्य जिल्ह्यांतील असे एकूण १५ रुग्ण उपचार करताना दगावले. आतापर्यंत कोराेनाने ८८८ जणांना प्राण गमवावा लागला.
धानोडी (ता. वरूड) येथील ६५ वर्षीय पुरुष, सामरानगर (अमरावती) येथील ८० वर्षीय महिला, अंबिकानगर (अमरावती) येथील ३१ वर्षीय महिला, कळमगाव (ता. चांदूर रेल्वे) येथील ५९ वर्षीय पुरुष, बाभूळगाव कोळी येथील ६० वर्षीय पुरुष, दिघोरी (नागपूर) येथील ४५ वर्षीय पुरुष, धारणी येथील ४० वर्षीय पुरुष, धामणगाव रेल्वे येथील ५६ वर्षीय महिला, नांदगाव खंडेश्वर येथील ४० वर्षीय महिला, राजना (ता. चांदूर रेल्वे) येथील ६० वर्षीय पुरुष, नागपूर येथील ५२ वर्षीय महिला, श्रीकृष्णनगर (अमरावती) येथील ६८ वर्षीय पुरुष, हिलटॉप कॉलनी (अमरावती) येथील ५४ वर्षीय पुरुष, यवतमाळ येथील ७७ वर्षीय महिला अशा एकूण १५ रुग्णांना जीव गमवावा लागला.
सोमवारी ६८० रुग्णांनी काेरोनावर मात केली. आतापर्यंत ५४ हजार ५३८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ६२ हजार ३४ आहे. गृहविलगीकरणात महापालिका क्षेत्रात १३३१, तर ग्रामीणमध्ये ३४९६ रुग्ण उपचार घेत आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण ६६०८ आहेत. कोरोनामुक्तीचा रिकव्हरी रेट ८७.९२ टक्के एवढा आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी ११४ दिवसांवर आला आहे. मृत्युदर १.४३ टक्के असा आरोग्य यंत्रणेने नोंदविला आहे. आतापर्यंत ४ लाख ४ हजार ६५३ नमुने चाचणी करण्यात आली आहे.