कर्जमाफीचे ७१ हजार अर्ज ‘मिसमॅच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 22:29 IST2018-01-31T22:29:17+5:302018-01-31T22:29:56+5:30
अद्यापही ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही, अशा ७१ हजार तात्पुरत्या अपात्र शेतकऱ्यांची यादी महाआॅनलाईनद्वारा मिसमॅच डाटा लिस्टच्या स्वरूपात बँकाना प्राप्त झालेली आहे.

कर्जमाफीचे ७१ हजार अर्ज ‘मिसमॅच’
आॅनलाईन लोकमत
अमरावती : अद्यापही ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही, अशा ७१ हजार तात्पुरत्या अपात्र शेतकऱ्यांची यादी महाआॅनलाईनद्वारा मिसमॅच डाटा लिस्टच्या स्वरूपात बँकाना प्राप्त झालेली आहे. सबंधीत बँकेशी संपर्क करून त्रुटीची पूर्तता केल्यास खातेदारांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. सद्यस्थितीत ९६ हजार शेतकºयांच्या खात्यात ५०९ कोटीची कर्जमाफी वर्ग करण्यात आली.
शासनाने दीड लाखांपर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. यासाठी एक लाख ९७ हजार ७९३ शेतकऱ्यांनी आॅनलाइन अर्ज पोर्टलवर भरलेत. शासनाच्या आयटी विभागाने पाठविलेल्या यादीनुसार सहकार विभाग व संबंधित बँकांनी यादीतील नावांची पडताळणी करून पुन्हा यादी आयटी विभागाला अपलोड केली. यामधील तात्पूरत्या पात्र शेतकºयांची यादी पुन्हा संबंधित बँकांना पाठविली.
आतापर्यंत ९६ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५०९ कोटींची कर्जमाफी वर्ग करण्यात आलेली आहे. पडताळणी दरम्यान ७१ हजार शेतकºयांच्या अर्जात त्रुटी आढळून आल्या आहेत. काही शेतकऱ्यांची माहिती बँकाकडे उपलब्ध नसल्यामुळे त्या लाभार्थ्यांची माहिती अपलोड करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. अशा शेतकऱ्यांना पुन्हा शासनाने एक संधी दिली आहे. सहकार विभागासह बँकेद्वारे ज्या शेतकऱ्यांची माहिती अपूर्ण आहे, अशा कर्जदार शेतकऱ्यांची यादी आता संबंधित बँकांना महाआॅनलाईनद्वारे येलो लिस्ट व मिसमॅच लिस्टच्या स्वरूपात प्राप्त झाली आहे. या सर्व याद्या संबंधित बँकांच्या शाखांमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी संबंधित बँक शाखेकडून, सेवा सहकारी संस्थेकडून कर्ज घेतले आहे. त्या बँकेशी किंवा गटसचिवाशी संपर्क करून आवश्यक त्या माहितीची पूर्तता सात दिवसांच्या आत केल्यास अशा शेतकऱ्यांची माहिती पुन्हा पाठविणे बँकांना सोईचे होऊन शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ घेता येणार असल्याचे जिल्हा उपनिबंधकांंनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या पात्रतेसाठी ४ कॉलम वाढणार
तात्पुरते अपात्र ७१ हजार शेतकऱ्यांची यादी जिल्हा बँकेसह व्यापारी बँकांना प्राप्त झाली आहे. यामध्ये आॅनलाईन अर्जात आधार क्रमांक चुकीचा किंवा पत्नीचे नाव सुटले किवा चुकीचे तसेच कर्जाच्या रकमेत चूक यासारख्या त्रुटी आहेत. शेतकऱ्यांनी या त्रुटींची पूर्तता त्वरित केल्यास त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. यापूर्वी १ ते ६६ कॉलमद्वारे लाभार्थ्यांची माहिती बँकाद्वारा भरण्यात आली. आता यामध्ये ४ कॉलम वाढविण्यात येणार आहेत. तात्पुरता अपात्र लाभार्थी पात्र कसा झाला याविषयीची माहिती त्यामध्ये राहणार असल्याची माहिती सहकार विभागाने दिली आहे.
सद्यस्थितीत ९६ हजार लाभार्थ्यांना ५०९ कोटींचा लाभ देण्यात आला. अद्याप ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, मात्र पात्र आहेत, त्यांनी संबंधित बँकेकडे सात दिवसांच्या आत त्रुटींची पूर्तता केल्यास त्यांना योजनेचा लाभ मिळू शकतो.
- गौतम वालदे,
जिल्हा उपनिबंधक