डीटीएड विद्यालयात ७० टक्के जागा रिक्त

By Admin | Updated: October 6, 2015 00:26 IST2015-10-06T00:26:28+5:302015-10-06T00:26:28+5:30

नोकरीची हमी नसल्याने विद्यार्थ्यांचा कल आता अध्यापक विद्यालयाकडे (डीटीएड) राहिलेला नाही.

70% of seats in DTED school are vacant | डीटीएड विद्यालयात ७० टक्के जागा रिक्त

डीटीएड विद्यालयात ७० टक्के जागा रिक्त

संख्या रोडावली : केवळ ३० टक्केच प्रवेश
प्रदीप भाकरे अमरावती
नोकरीची हमी नसल्याने विद्यार्थ्यांचा कल आता अध्यापक विद्यालयाकडे (डीटीएड) राहिलेला नाही. त्यामुळे राज्यभरात या विद्यालयांना घरघर लागली आहे. जिल्ह्यातील २७ अध्यापक विद्यालयांतील ७० टक्के प्रवेश रिक्त असून गेल्या चार वर्षांत जिल्ह्यातील १० पेक्षा अधिक अध्यापक विद्यालये बंदे पडली आहेत.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेअंतर्गत जिल्ह्यात २७ अध्यापक विद्यालये आहेत. या २७ अध्यापक विद्यालयांमधील एकूण प्रवेशक्षमता १३२७ असून त्यापैकी केवळ ४१९ म्हणजे ३० टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तब्बल ७० टक्के प्रवेश रिक्त आहेत. यात मराठी, हिंदू व उर्दू माध्यमांच्या विद्यालयांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील अमरावती तालुक्यात (शहरासह) १२, तिवसा -२, वरुडमध्ये २, चांदूरबाजार २, चिखलदरा १, दर्यापूर ३, अचलपूर २, अंजनगाव सुर्जी १ तथा धामणगाव रेल्वे तालुक्यात २ अध्यापक विद्यालये आहेत. विनाअनुदानित अध्यापक विद्यालयांनी विविध प्रलोभने दाखवून विद्यार्थी मिळविले आहेत. मात्र अनुदानित विद्यालयातील व्यवस्थापन विद्यार्थ्यांचा प्रवेश करण्यात अयशस्वी ठरले आहे. गेल्या चार वर्षात ११ अध्यापक विद्यालये बंद पडली असताना सध्या सुरु असलेल्या २७ पैकी ८/९ विद्यालये नजीकच्या कालावधीत बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

का लागली घरघर ?
अनेक वर्षांपासून इयत्ता बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सरळ डीटीएड करण्यासाठी पुढाकार घेत असे. मात्र मागील काही वर्षांपासून शिक्षकांची भरती प्रक्रिया बंद झाल्याने व सीईटी परीक्षा घेण्यात न आल्याने डीटीएड विद्यार्थ्यांची हळूहळू बेकारी वाढत गेली.
यासाठी शासनाने टीईटी आणि सीईटी या दोन परीक्षा बंधनकारक केल्याने डीटीएड झालेले विद्यार्थी टीईटी परीक्षेतूनच बाहेर निघत नसल्याने व सीईटी परीक्षा कधी घेतली जाणार याची तारीख निश्चित नसल्याने बेरोजगारांची संख्या वाढली. नौकरीची हमी नसल्याने दोन वर्षे व्यर्थ का घालवायचे, अशी मानसिकता झाली व त्यातून दोन वर्षांपासून डीटीएडकडे पाहण्याचा विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन बदलला.

चार वर्षांत १० विद्यालये बंद
ज्या अध्यापक विद्यालयांना विद्यार्थी मिळाले नाहीत, ज्यांना विद्यार्थ्यांची पळवापळवी जमली नाही, अशी जिल्ह्यातील १० अध्यापक विद्यालये मागील चार वर्षांत बंद पडलीत. २०११-१२ मध्ये जिल्ह्यात ३८ अध्यापक विद्यालये होती. २०१५-१६ च्या सत्रात २७ अध्यापक विद्यालये आहेत.

सीईटी झाली नाही आणि टीईटीमध्ये विद्यार्थी टिकत नाही, अशा विपरीत परिस्थितीत डीटीएडला प्रवेशसंख्या रोडावली आहे. दोन वर्षांचा अभ्यासक्रम करूनही नोकरीची हमी नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याकडे पाठ फिरविली आहे.
- मिलिंद कुबडे,
प्राचार्य, जिल्हा शिक्षण व
प्रशिक्षण संस्था, अमरावती.

Web Title: 70% of seats in DTED school are vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.