पश्चिम विदर्भातील ४९९ प्रकल्पांत ६३.६८ टक्के पाणीसाठा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 16:27 IST2018-09-29T16:26:20+5:302018-09-29T16:27:57+5:30
आठवड्याभरापूर्वी पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने अनेक प्रकल्पांच्या पातळीत काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

पश्चिम विदर्भातील ४९९ प्रकल्पांत ६३.६८ टक्के पाणीसाठा!
संदीप मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पश्चिम विदर्भातील ४९९ प्रकल्पांत ६३.६८ टक्के सरासरी पाणीसाठा शिल्लक आहेत. यामध्ये नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्पांचा समावेश आहे. मात्र, बुलडाणा जिल्ह्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने या जिल्ह्यातील अनेक प्रकल्प हे तहानलेलेच असल्याने उन्हळ्यात या जिल्ह्यात पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. त्या कारणाने प्रशासनाचे व नागरिकांची चिंता वाढली आहे.
आठवड्याभरापूर्वी पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने अनेक प्रकल्पांच्या पातळीत काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
पाचही जिल्ह्यांतील नऊ मोठ्या प्रकल्पामध्ये सरासरी ६०.३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मध्यम प्रकल्पांची स्थिती थोडी चांगली असून, २४ मध्यम प्रकल्पांमध्ये ७१.१७ टक्के पाणीसाठा आहे. ४६६ लघू प्रकल्पांमध्ये सरासरी ६३.७३ टक्के पाणीसाठा आहे. यामध्ये सर्व प्रकल्पांची प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा हा ३२८३.६३ दलघमी आहे, तर आजचा उपयुक्त पाणीसाठा हा २०९०.८८ दलघमी शिल्लक आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ, व वाशिम जिल्ह्याच्या अनेक मध्यप प्रकल्पांची स्थिती चांगली असून, काही प्रकल्प हे शंभर टक्के भरले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्प मात्र ४० टक्क्यांपेक्षा जास्त भरलेले नाहीत. त्या कारणाने चिंता वाढली आहे.
पाचही जिल्ह्यांतील मोठ्या प्रकल्पांची स्थिती
मोठ्या प्रकल्पातून त्या-त्या जिल्ह्यातील शहराला व परिसरातील गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. यामध्ये अमरावती शहराला पाणीपुरवठा करणारे अप्पर वर्धा धरण यावेळीस पुरेसे भरले नाही. मध्य प्रदेश व काटोल परिसरात पाऊस हवा होता. तेथील नद्यांना पूर न आल्याने धरणात फक्त आजपर्यंत ५२.१० टक्के पाणीसाठा आहे. गेल्या आठवड्यात यामध्ये पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्प १०० टक्के, अरुणावती ९५.५० टक्के, बेंबळा ६०.७७ टक्के भरले आहेत, तर अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा ९४.२७ टक्के, वान ९६.४४ टक्के भरले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांची स्थिती अतिशय नाजूक असून, नळगंगा प्रकल्पात १८.१० टक्के, तर पेनटाकळी प्रकल्पात १९.३८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.