60 लसीकरण केंद्र बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 23:56 IST2021-04-10T23:56:07+5:302021-04-10T23:56:49+5:30
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्यांदा अशी स्थिती उद्भवली आहे. नागरिकांचा रिस्पॉन्स वाढल्यानंतर दोन अंकी केंद्रांची संख्या तीन अंकी झाली. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जिल्ह्यात १५० लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. १३० केंद्रांमध्ये कोविशिल्ड व २० केंद्रांवर कोव्हॅक्सिनची लस दिली जात आहे. आता जिल्हास्तरावरील कोविशिल्डचा साठा संपल्यामुळे १३० केंद्रांजवळ असलेल्या साठ्याच्या आधारे लसीकरण केले जात आहे.

60 लसीकरण केंद्र बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लसीकरण उत्सवाचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर दोन दिवसांत जिल्ह्यात त्याची वाट लागली आहे. शनिवारपासून ६० पेक्षा अधिक लसीकरण केंद्रे बंद असल्याची अधिकृत माहिती आहे. कोविशिल्डचा स्टॉक संपला आहे. कोव्हॅक्सिनचे दोन हजार डोज संपल्यानंतर रविवारी उर्वरित केंद्रही बंद पडतील.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्यांदा अशी स्थिती उद्भवली आहे. नागरिकांचा रिस्पॉन्स वाढल्यानंतर दोन अंकी केंद्रांची संख्या तीन अंकी झाली. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जिल्ह्यात १५० लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. १३० केंद्रांमध्ये कोविशिल्ड व २० केंद्रांवर कोव्हॅक्सिनची लस दिली जात आहे. आता जिल्हास्तरावरील कोविशिल्डचा साठा संपल्यामुळे १३० केंद्रांजवळ असलेल्या साठ्याच्या आधारे लसीकरण केले जात आहे. यात ज्या केंद्राचा साठा संपला, तेथून नागरिकांना रीत्या हाताने परतावे लागणार असल्याचे वास्तव आहे.
डीएचओंच्या माहितीनुसार, शनिवारी दुपारपर्यंत ३५ प्राथमिक आरोग्य केंद्रे, चार उपजिल्हा रुग्णालये, महापालिका क्षेत्रातील नऊ व एक खासगी केंद्रावरील कोविशिल्ड लसीचा साठा संपल्याने या ४९ केंद्रांवरील लसीकरण बंद झालेले आहे. त्यामुळे ज्यांनी पहिला डोस घेतला व त्यांचा बुस्टर डोस आता आहे, त्या व्यक्तींना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
ऑनलाईन स्टॉक निरंक, ते केंद्र बंद
जिल्ह्यातील १५० केंद्रांवर लसीकरणासह स्टाॅकची ऑनलाईन नोंद होते व स्टॉक निरंक असलेल्या केंद्राची संख्या पाहूनच जिल्ह्याला लसीचा पुरवठा होतो. सद्यस्थितीत ४९ केंद्रांवर साठा निरंक असल्याचे ऑनलाईन दिसत असले तरी काही केंद्रांत साठा नगण्य असल्याने ती केंद्रेदेखील बंद असल्यातच जमा आहे, असे आरोग्य विभागाने कळविले.
मोर्शीत केंद्राला टाळे
मोर्शी तालुक्याला प्राप्त ९५२० कोव्हॅक्सिन लसींपैकी ९१०४ डोज देण्यात आले. ४१४ व्हॅक्सिन वेस्टेज गेल्याने शनिवारपासून लसीकरण विभागाला टाळे लावण्यात आले. फलकावर सूचना देऊन कर्मचारी मोकळे झाले आहेत.
४.५० लाख डोजेजची मागणी
१४ एप्रिलला मिळणार
आतापर्यंत १ लाख ९० हजार ३३४ नागरिकांचे लसीकरण झाले. आता ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्यात येत असल्याने ज्येष्ठांसह या वर्गातील नागरिकांचीदेखील केंद्रांवर गर्दी झाली व नियोजन कोलमडल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यासाठी ४.५० लाख डोजची मागणी नोंदविण्यात आली. यात २.५० लाख कोविशिल्ड, तर २ लाख कोव्हॅक्सिनचे डोस राहतील. प्रत्यक्षात १४ एप्रिलला साठा मिळणार आहे.
शुक्रवारी ६,४४१ व्यक्तींचे लसीकरण
जिल्ह्यात शुक्रवारी ६,४४१ नागरिकांचे लसीकरण झाले. यात आरोग्य कर्मचारी ९६, फ्रंट लाईन वर्कर २३१, ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील ३,९२१ नागरिक व ६० वर्षांवरील २,१९४ नागरिकांचा समावेश आहे. प्रत्यक्ष कोविन ॲपवर १३,३८० नोंदणी झाली होती. त्याच्या ४८ टक्के प्रमाणात हे लसीकरण झाले आहे.