जिल्ह्यातील ५५० सिंचन विहिरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:39 IST2020-12-11T04:39:00+5:302020-12-11T04:39:00+5:30
धामणगाव रेल्वे : अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विशेष घटक योजनेत सुधारणा ...

जिल्ह्यातील ५५० सिंचन विहिरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत
धामणगाव रेल्वे : अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विशेष घटक योजनेत सुधारणा करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुरू करण्यात आली. या योजनेतील ५५० सिंचन विहिरी दोन वर्षांपासून वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत.
या योजनेअंतर्गत दीड लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोरिंग वीज जोडणी, आकार पंप संच, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण या बाबीसाठी अनुदान देण्यात येते. जिल्ह्यात सन २०१८-१९ या वर्षात ३७६ पैकी ३३१ सिंचन विहिरी पूर्ण करण्यात आल्या. सन २०१९-२० या वर्षात ५२८ पैकी २३४ विहिरींचे बांधकाम पूर्ण झाले. आपल्या विहिरीला वीज जोडणी मिळावी, म्हणून दोन वर्षात ५५४ शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केले. २३६ शेतकऱ्यांनी वीज जोडणीची रक्कम भरली. मात्र, ८८ शेतकऱ्यांच्या विहिरीला वीज जोडणी मिळू शकली.
विहिरीत पाणी असूनही ओलित अशक्य
कृषी विभागाकडून वीज जोडणीला १० हजार रुपये अनुदान देण्यात येते. वीज मंडळाकडे अर्ज करूनही अद्याप वीज जोडणी मिळाली नाही. यंदा झालेल्या अधिक पावसामुळे विहिरीला पाणी आहे. मात्र, वीज जोडणी मिळाली नसल्याने रबी हंगामात कोणतेही पीक घेता येत नाही. शेजारचे शेतकरीही पाणी देण्यास तयार नसल्याने दुसऱ्या वर्षीचा रबी हंगाम वाया गेला आहे.
कोट
वर्षभरापुर्वी या योजनेंतर्गत विहिरीचे काम पूर्ण झाले. मात्र, अद्याप वीज जोडणी मिळाली नाही. त्यामुळे ओलिताचे कोणतेच पीक घेता येत नाही. शासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे.
- प्रकाश बगाडे,
शेतकरी, काशीखेड
कोट २
महावितरणकडे ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले, त्यांची डिमांड भरून घेतली जात आहे. तसेच निधी उपलब्ध होताच टप्प्याटप्प्याने वीज जोडणी दिली जात आहे.
- अनिरुद्ध आलेगावकर,
कार्यकारी अभियंता, महावितरण