५५ टक्के विद्यार्थ्यांची भाषा अप्रगत

By Admin | Updated: January 5, 2016 00:02 IST2016-01-05T00:02:49+5:302016-01-05T00:02:49+5:30

जिल्ह्यातील इयत्ता दुसरी ते आठवीमधील तब्बल ५५ टक्के विद्यार्थी मराठी भाषेत अप्रगत असल्याचा खळबळजनक निष्कर्ष पायाभूत चाचणीनंतर घेतलेल्या अभ्यासातून काढण्यात आला आहे.

55 percent of the students are not subject to age | ५५ टक्के विद्यार्थ्यांची भाषा अप्रगत

५५ टक्के विद्यार्थ्यांची भाषा अप्रगत

पायाभूत चाचणीचा प्रातिनिधिक निष्कर्ष : गणितही कच्चे, फेब्रुवारीमध्ये होणार पुन्हा एक चाचणी
प्रदीप भाकरे अमरावती
जिल्ह्यातील इयत्ता दुसरी ते आठवीमधील तब्बल ५५ टक्के विद्यार्थी मराठी भाषेत अप्रगत असल्याचा खळबळजनक निष्कर्ष पायाभूत चाचणीनंतर घेतलेल्या अभ्यासातून काढण्यात आला आहे. सप्टेंबर २०१५ मध्ये जिल्ह्यातील खासगी, जिल्हा परिषद, मनपा, न.पा. तथा सीबीएसई, आयसीएसई माध्यमातील इयत्ता दुसरी ते आठवीमधील विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर हे निष्कर्ष काढण्यात आलेत. जिल्ह्यातील ४५ टक्के विद्यार्थ्यांनाच मराठी व गणित या दोन विषयांचे बऱ्यापैकी ज्ञान आहे.
गेल्या काही वर्षात राज्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत घट झाल्याने प्राथमिक शिक्षणाचा दर्जा तपासण्याचे शासनस्तरावरुन ठरविण्यात आले. त्यासाठी इयत्ता दुसरी ते आठवीमधील विद्यार्थ्यांच्या गणित व भाषा विषयामधील क्षमता जाणून घेण्यात आल्या.

पायाभूत चाचणीचे संपादन
अमरावती : सप्टेंबर २०१५ मध्ये झालेल्या पायाभूत चाचणीमध्ये मोठे गैरप्रकारही उघड झाले होते.
जिल्ह्यातील सव्वालाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी घेतल्यानंतर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्रतिनिधिक स्वरुपात त्यांनी दत्तक घेतलेल्या शाळांमधील पायाभूत चाचणीचे संपादन करुन निष्कर्ष नोंदविले. त्यात जिल्ह्यातील तब्बल ५५ टक्के विद्यार्थी मराठी भाषेमध्ये अप्रगत असल्याचे वास्तव उघड झाले आहे. जिल्ह्यातील केवळ ३८.१२ टक्के विद्यार्थ्यांना मजकुराचे श्रृतलेखन करता आले. तर ३१.६१ टक्के विद्यार्थी व्याकरणावर आधारीत प्रश्न सोडवू शकले. याशिवाय केवळ ३०.०२ टक्के विद्यार्थी स्वत:च्या शब्दात लेखी अभिव्यक्ती करु शकले. या निष्कर्षावरुन जिल्ह्यातील विद्यार्थी मराठी भाषेमध्ये अप्रगत असल्याचे दिसून आले आहे.

२९ हजार ८९७ विद्यार्थ्यांचा अभ्यास
पायाभूत चाचणी पार पडल्यानंतर जिल्हा व प्रशिक्षण संस्थेने दत्तक घेतलेल्या जिल्हा परिषदेच्या ४६१ शाळांचा अभ्यास करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या एकूण शाळांपैकी या शाळांचे प्रमाण ३० टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण पटसंख्येच्या २५ टक्के प्रमाण असलेल्या २९,८९७ विद्यार्थ्यांचे यात निरिक्षण नोंदविले गेले. पायाभूत चाचणी झाल्यानंतर प्रातिनिधीक स्वरुपात निष्कर्ष काढण्यात आले.

सर्वच माध्यमातून घेतली गेली पायाभूत चाचणी
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानांतर्गत सीबीएसई, आयसीएसईसह राज्य शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या दुसरी ते आठवीच्या वर्र्गातील विद्यार्थ्यांसाठी पायाभूत चाचणी सप्टेंबर २०१५ मध्ये घेण्यात आली. राज्यात शालेय शिक्षण विभागांतर्गत ‘गुणवत्ता केंद्रबिंदू’ मानून विद्यार्थ्यांची चाचणी घेण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.

गणितात सरासरी ५० टक्के विद्यार्थी प्रगत
जिल्ह्यात सप्टेंबर १५ मध्ये घेण्यात आलेल्या गणितातील पायाभूत चाचणीमध्ये सरासरी ५० टक्के विद्यार्थी प्रगत ठरले आहेत. इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची तोंडी/प्रात्यक्षिक आणि लेखीच्या माध्यमातून गणिताची पायाभूत चाचणी (बेसलाईन टेस्ट) घेण्यात आली.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेव्दारे दत्तक घेतलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या भाषा आणि गणित चाचणीतील संपादणुकीचा अभ्यास करण्यात आला. ज्या शाळा पायाभूत चाचणीत कमी पडल्यात, तेथे कृती कार्यक्रम राबविला जाईल.
- पवन मानकर, अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था.

Web Title: 55 percent of the students are not subject to age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.