रेमडेसिवीरचे ५४० व्हायल उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:14 IST2021-04-27T04:14:15+5:302021-04-27T04:14:15+5:30
अमरावती : खासगी रुग्णालयांत रेमडेसिवीर इंजेक्शनचा अनावश्यक वापर होऊ नये, यासाठी समन्वय यंत्रणा कार्यान्वित असून, उपलब्धता व नियंत्रणासाठी सर्वंकष ...

रेमडेसिवीरचे ५४० व्हायल उपलब्ध
अमरावती : खासगी रुग्णालयांत रेमडेसिवीर इंजेक्शनचा अनावश्यक वापर होऊ नये, यासाठी समन्वय यंत्रणा कार्यान्वित असून, उपलब्धता व नियंत्रणासाठी सर्वंकष प्रयत्न होत आहेत, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सोमवारी येथे सांगितले. जिल्ह्यात रेमडेसिवीरचे ५४० व्हायल आणखी उपलब्ध झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
जिल्ह्यात गरजू रुग्णांना रेमडेसिवीर उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावरून समन्वय ठेवण्यात येत आहे. रेमडिसीवीरचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी व काळा बाजार होऊ नये, यासाठी भरारी पथकही नेमण्यात आले आहे. सर्वच रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठाही सुरळीत ठेवण्यात येत आहे. भिलाई येथून ऑक्सिजन टँकरद्वारे पुरवठा होत असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी बळवंत गोटमारे यांनी सांगितले. रेमडेसिवीरच्या दीड हजार व्हायल शासकीय औषधी भांडारकडे उपलब्ध असून, त्याशिवाय ५४० व्हायल उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. गरजू रुग्णांनाच हे इंजेक्शन उपलब्ध करून दिले जात आहे. अनावश्यक वापरावर निर्बंध आहेत. २२ खासगी कोविड रुग्णालये उपचारासाठी सज्ज असल्याचे प्रशासनाने सांगितले.
कोविड रुग्णालयांतील खाटांची स्थिती, उपलब्ध साधनसामग्री याबाबत माहिती कळण्यासाठी कोविड सुविधा हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. ते वेळोवेळी अद्ययावत करून माहिती प्रसारित करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी नवाल यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.